पावसाची जिल्ह्याकडे पुन्हा पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:01:09+5:30

जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यापैकी आतापर्यंत एकूण ४४ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. तर १ लाख ४५ हजार हेक्टरवरील रोवण्या अद्याप शिल्लक आहे.

The rains return to the district | पावसाची जिल्ह्याकडे पुन्हा पाठ

पावसाची जिल्ह्याकडे पुन्हा पाठ

ठळक मुद्देकेवळ २५ टक्के रोवण्या पूर्ण । पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांवरील संकटात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जुलै महिना अर्धा लोटला तरी अद्यापही पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही. परिणामी रोवणी खोळंबण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत केवळ २५ टक्के रोवण्या झाल्या असून अजून ७५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. पावसाने पाठ दाखविल्याने शेतकऱ्यांवरील संकटात वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यापैकी आतापर्यंत एकूण ४४ हजार हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. तर १ लाख ४५ हजार हेक्टरवरील रोवण्या अद्याप शिल्लक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे तसेच सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या मदतीने शेतकऱ्यांनी रोवणी आटोपली. मागील पंधरा दिवसांपासून अद्यापही जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही. याचा रोवणीच्या कामावर परिणाम होत आहे.
येत्या चार पाच दिवसात दमदार पाऊस न झाल्यास सुरू असलेल्या रोवण्या देखील पूर्णपणे खोळंबण्याची शक्यता आहे.आकाशात दररोज ढग दाटून येत असल्याने दमदार पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. मात्र पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची आशा देखील फोल ठरत आहे.
यंदा सुरूवातीपासूनच पावसाने पाठ दाखविल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण कायम होते. जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो. मात्र यंदा जुलै महिना अर्धा संपत आला तरी सरासरीच्या केवळ २६०.६७ मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाची तूट वाढत चालली आहे. ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने आणि सध्या स्थितीत पावसाने पाठ फिरविली असल्याने शेतकऱ्यांच्या काळजीत वाढ होत आहे. मागील वर्षी देखील सुरूवातीला पाऊस लांबला होता. मात्र जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने रोवणीची कामे वेळेत पूर्ण झाली होती. पण यंदा चित्र फारच बिकट आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते कशी बशी आपली रोवणी आटोपत आहेत. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असणाऱ्यां शेतकऱ्यांच्या रोवण्या पूर्ण खोळंबल्याचे चित्र आहे. येत्या पाच सहा दिवसात दमदार पाऊस न झाल्याने रोवण्या खोळंबून बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहे.

उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता
धानाच्या रोवणीसाठी १५ ऑगस्टपर्यंतचा कालावधी अनुकुल मानला जातो. मात्र त्यापेक्षा उशिर झाल्यास त्याचा धानाच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत रोवणीची कामे आटोपण्याची शेतकऱ्यांची लगबग असते. यंदा जुलै महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. तर कडक उन्ह तापत असल्याने बांध्यां सुध्दा कोरड्या पडत आहे. पऱ्हे देखील वाळण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान पाऊस लांबल्यास धानाच्या उत्पादनावर १० ते २० टक्के परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

जिल्ह्यात अद्यापही रोवणी योग्य पाऊस झालेला नाही. जुलै महिन्यात दमदार पाऊस बरसण्याची अपेक्षा होती. मात्र अजुनही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणीची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. तर पऱ्हावर सुध्दा याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

Web Title: The rains return to the district

टॅग्स :Rainपाऊस