पाऊस लपला; आता उकाड्याने सर्वच हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST2021-05-17T04:27:49+5:302021-05-17T04:27:49+5:30

गोंदिया : मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावून वातावरणात गारवा निर्माण केल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मात्र, आता पाऊस ...

The rain hid; Now Ukadya is harassing everyone | पाऊस लपला; आता उकाड्याने सर्वच हैराण

पाऊस लपला; आता उकाड्याने सर्वच हैराण

गोंदिया : मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावून वातावरणात गारवा निर्माण केल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मात्र, आता पाऊस लपला असून ऊन तापत असल्याने व सोबतच उकाडा वाढल्याने सर्वच हैराण झाले आहेत. त्यात आता नवतपा लागणार असल्याने सर्वांनाच धडकी भरली असून सर्वांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत.

तीनही ऋतूंमध्ये सर्वांत जड जाणारा ऋतू म्हणजे उन्हाळा आहे. उन्हामुळे बाहेर जाणे तर सोडाच, घरात राहणेही कठीण होते. उकाड्याने जिवाची लाहीलाही होत असून मे हीटमध्ये तर एसी व कूलरही अपयशी होतात. परिणामी, उन्हाळ्याचे हे दिवस कसेतरी निघून जावेत, अशीच सर्वांची इच्छा असते. यंदा उन्हाळ्याचे दोन महिने कसेतरी निघून गेले. मात्र मे महिना आता चांगलाच तळपू लागला आहे. मे महिन्याची सुरुवात वादळी पावसाने झाल्याने सुरुवातीचे दिवस चांगले थंडगार गेले. आता मात्र पावसाने दडी मारली असून मे-हीट आपला तडाखा दाखवीत आहे.

येत्या २५ तारखेपासून नवतपा लागणार असल्याने त्यात अधिकची भर पडली असून सर्वांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. सध्या तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आत असले तरी पडलेल्या पावसानंतर आता उकाडा (उमस) वाढल्याने जीव कासावीस होऊ लागला आहे. ७ जूनपासून मान्सून लागणार असल्याने आता उरलेले हे दिवस कसेतरी निघून जावेत, अशीच सर्वांची इच्छा असून पावसाचे वेध लागले आहेत.

---------------------------------

तापमान ३९ अंश सेल्सिअस

रविवारी जिल्ह्याचे तापमान ३९.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मे महिन्यातील ऊन बघता हे तापमान कमी असले तरी पडलेल्या पावसामुळे उकाडा वाढला आहे. रखरखत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून एसी व कूलर फेल ठरत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटपासूनच पाऊस हजेरी लावतो व नवतपा पावसातच निघून जात असल्याचा अनुभव आहे. यंदाही तसेच काही घडो, अशीच सर्वांची इच्छा आहे.

Web Title: The rain hid; Now Ukadya is harassing everyone