ओबीसी कृती समितीने व्यक्त केला पालकमंत्र्यांवर रोष

By Admin | Updated: March 29, 2016 03:05 IST2016-03-29T03:05:09+5:302016-03-29T03:05:09+5:30

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले ओबीसी समाजाच्या समस्या ऐकून घेण्यास

OBC Action Committee expressed anger over Guardian Minister | ओबीसी कृती समितीने व्यक्त केला पालकमंत्र्यांवर रोष

ओबीसी कृती समितीने व्यक्त केला पालकमंत्र्यांवर रोष

गोंदिया : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले ओबीसी समाजाच्या समस्या ऐकून घेण्यास वेळ देत नाहीत, चर्चा करीत नाहीत असा आरोप करीत ओबीसी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याविरूद्ध नारेबाजी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी ओबीसी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करीत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पालकमंत्र्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत अन्यथा त्यांना गावबंदी, जिल्हाबंदी करू, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. मात्र आपण ओबीसी समाजाबद्दल कोणतेही अपशब्द बोललो नसताना काही लोक राजकीय भूमिकेतून अशा पद्धतीने आरोप करीत असल्याचे पालकमंत्री बडोले यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, नॉन क्रिमिलेयरची मर्यादा वाढविणे, ओबीसी समाजाची जनगणना अशा अनेक मुद्द्यांवर ओबीसी संघर्ष कृती समितीचा संघर्ष सुरू आहे. यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री या नात्याने ना.बडोले यांनी सदर जिल्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी समितीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. यातूनच सोमवारी दुपारी ना.बडोले गोंदियातील सामाजिक न्यायभवनातील कार्यक्रम आटोपून निघत असताना ओबीसी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी अमर वराडे, बबलू कटरे, बी.एम.करमकर, कैलाश भेलावे, आशिष नागपुरे व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले. आपल्या मागण्यांचे निवेदन ना.बडोले यांना देऊन चर्चाही करण्यात आली. मात्र त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरूद्ध घोषणाबाजी सुरू केली. ‘पालकमंत्री हाय हाय, मुख्यमंत्री हाय हाय, नॉन क्रिमिलेयरचे झाले काय, पालकमंत्री मुर्दाबाद’ अशा घोषणा देणे सुरू केले. हा प्रकार पाहून पालकमंत्री चिडून अपशब्द बोलले, असा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अन्यथा त्यांना गावबंदी करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

ओबीसी समाजाबद्दल मला आपुलकी- बडोले
४काहीही कारण नसताना घोषणाबाजी सुरू केल्यामुळे मी एका ओबीसी कार्यकर्त्याला हा काय प्रकार आहे असे म्हणून नाराजी व्यक्त केली. पण ओबीसी समाजाचा अनादर होईल असे कोणतेही शब्द बोललो नाही. ओबीसी समाजाबद्दल मला आपुलकी आहे. केवळ तुम्ही ओबीसी समाजाचे आहे म्हणून ओबीसींचे नेते झाले असे नाही. मीसुद्धा ओबीसी समाजासाठी आपल्या विभागामार्फत शिष्यवृत्तीसाठी निधी मिळवून दिला. केवळ राजकीय भूमिकेतून काही लोक असा आरोप करीत असतील तर त्याला अर्थ नाही, अशा शब्दात ना.राजकुमार बडोले यांनी आपली बाजू सांगितली.

Web Title: OBC Action Committee expressed anger over Guardian Minister