वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज

By Admin | Updated: March 23, 2015 01:39 IST2015-03-23T01:39:50+5:302015-03-23T01:39:50+5:30

आजचे विद्यार्थी भविष्याचे नागरिक आहेत आणि भारत निर्माणासाठी त्यांचे योगदान हे अमूल्य राहणार आहे.

The Need for Scientific Perspective | वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज

वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज

गोंदिया : आजचे विद्यार्थी भविष्याचे नागरिक आहेत आणि भारत निर्माणासाठी त्यांचे योगदान हे अमूल्य राहणार आहे. त्यामुळेच आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे काळाची गरज आहे. हे काम अदानी फाऊंडेशन अपूर्व विज्ञान मेला यासारख्या कार्यक्रमांद्वारे करीत आहे, असे प्रतिपादन अदानी पॉवर लिमीटेडचे स्टेशन हेड सी.पी. साहू यांनी केले.
अदानी फाऊंडेशनच्यावतीने छत्रपती दुबे प्राथमिक शाळेच्या मैदानात आयोजित अपूर्व विज्ञान मेला व प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
उद्घाटन तिरोडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सी.जे. पटेल महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए.बी. वाखले, चिखलीचे सरपंच कैलाश पटले, अदानी फाऊंडेशनचे समन्वयक सुबोध सिंग, सुरेश अग्रवाल उपस्थित होते. प्रास्ताविकात सिंग यांनी अपूर्व मेला व प्रदर्शनाचे आयोजन करण्यामागे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान या विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिकाला प्रेरणा मिळावी, हा उद्देश असल्याचे सांगितले. उद्घाटक उरकुडे यांनी, विज्ञान हे भारताला नवीन नसून ते परंपरागत आहे आणि हिच परंपरा जोपसण्याचे काम अदानी फाऊंउेशन अपूर्व विज्ञान मेला यासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत आहे. त्यांचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. तर वाखले यांनी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू प्रवृत्ती तसेच विज्ञानाशी मैत्री दृढ करण्याकरिता अतिशय स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे मत व्यक्त केले.
अदानी फाऊंडेशनाच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या एकूण २२ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद हायस्कूल सुकडी-डाक, जिल्हा परिषद कन्या हायस्कूल तिरोडा तसेच जिल्हा परिषद हायस्कूल करटी (बु.) येथील ८४ विद्यार्थी तसेच २६ शिक्षकांनी या प्रदर्शनात भाग घेतला होता.
विद्यार्थ्यांनी घरगुती उपकरणे तसेच अतिशय अल्प दरात मिळणाऱ्या वस्तुंपासून प्रदर्शनामध्ये मॉडेल्स तयार केले होते. संचालन जयश्री काळे यांनी तर आभार राहुल शेजव यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The Need for Scientific Perspective