मोर्चाने सालेकसा दणाणले

By Admin | Updated: December 8, 2015 02:05 IST2015-12-08T02:05:09+5:302015-12-08T02:05:09+5:30

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मोर्चाने सालेकसा दणाणून

Morcha Salakeasa Dainale | मोर्चाने सालेकसा दणाणले

मोर्चाने सालेकसा दणाणले

सालेकसा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मोर्चाने सालेकसा दणाणून सोडले. पक्षभेद बाजूला ठेवून तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हा विशाल मोर्चा काढला व शासनाचा निषेध करीत तहसील कार्यालयावर धडक दिली.
शासनाकडून शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या जात नाहीत, हे शासन संवेदनशून्य झाले आहे असे म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा सुध्दा काढली. शेतकऱ्यांमधील हा असंतोष पाहून संपूर्ण सालेकसा परिसर दणाणून गेला.
या मोर्चाचे नेतृत्व तिरोडाचे माजी आ.दिलीप बन्सोड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.सदस्य दुर्गा तिराले, जिल्हा महासचिव बबलू कटरे, लक्ष्मण नागपुरे, प्रभाकर दोनोडे, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, माजी सभापती तुकाराम बोहरे, उपसभापती राजकुमार विश्वकर्मा आदीनी केले.
मोर्चा तहसील कार्यालयात पोहचल्यानंतर काही नेत्यांनी मागण्यांसंदर्भात मार्गदर्शन केले. शेवटी तहसीलदार प्रशांत सांगळे यांना मुख्यमंत्र्याच्या नावाचे निवेदन देण्यात आले.
मोर्चात गोपाल तिराले, मनोज विश्वकर्मा, निर्दोष साखरे, दौलत अग्रवाल, पप्पू राणे, पूजा वरखडे, ओमप्रकाश पारधी, रविंद्र चुटे, रामेश्वर पंधरे, विनोद अग्रवाल, संतोष नागपुरे, सुरेश मच्छिरके, मनोज शरणागत आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

अशा आहेत मागण्या -
प्रमुख मागण्यांमध्ये संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.
भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण करावे.
स्वस्त धान्य दुकानातून सर्वांना धान्य देण्यात यावे.
शेतकऱ्यांचे विजेचे बिल माफ करावे
उन्हाळी धान पीकासाठी पाणी द्यावे

लक्षवेधी मोर्चा आणि प्रेतयात्रा
मोर्चाच्या सुरूवातीला मुस्लीम कब्रस्तान परिसरात तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी महिला-पुरूष एकवटले आणि विशाल मोर्चा काढीत पोलीस स्टेशन, बाजार चौक, गांधी चौक, बस स्टॅन्ड, पंचायत समिती, वनविभाग चौकावरून मार्गक्रमण करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. सोबतच कब्रस्तानवरून शासनाची प्रतिकात्मक शवयात्रासुध्दा काढण्यात आली. अंत्ययात्रेनंतर अग्निसंस्काराचा कार्यक्रमही घेण्यात आला. यामुळे संपूर्ण सालेकसावासी व आठवडी बाजारात आलेले लोक चकीत झाले.

Web Title: Morcha Salakeasa Dainale