कोरोनाबाधितांच्या वाढीला लागतोय ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST2021-05-17T04:27:53+5:302021-05-17T04:27:53+5:30

गोंदिया : कोरोनाबाधितांची संख्या आता जिल्ह्यात हळूहळू ओसरत आहे. मागील तीन दिवसांत रुग्ण संख्येत विक्रमी घट झाली असून बाधित ...

The growth of corona is taking a break | कोरोनाबाधितांच्या वाढीला लागतोय ब्रेक

कोरोनाबाधितांच्या वाढीला लागतोय ब्रेक

गोंदिया : कोरोनाबाधितांची संख्या आता जिल्ह्यात हळूहळू ओसरत आहे. मागील तीन दिवसांत रुग्ण संख्येत विक्रमी घट झाली असून बाधित रुग्णांची संख्या दीडशेच्या आतच आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सुध्दा बरीच कमी झाल्याचे समाधानकारक चित्र आहे.

जिल्ह्यात रविवारी (दि.१६) ३९७ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर १२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. ६ रुग्णांचा खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या १२८ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ३८, तिरोडा ३, गोरेगाव ९, आमगाव ६, सालेकसा ३७, देवरी २६, सडक अर्जुनी २, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ६ आणि बाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोनासंदर्भात वाढत असलेली जनजागृती, लक्षणे दिसताच चाचणी करण्याचे वाढलेले प्रमाण आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण यामुळे कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने डाऊन होत असून मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोना आता काढता पाय घेत असल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १४४०९८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ११९२६० नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १४६७३८ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२६१५१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३९३२९ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ३५५७७ बाधितांनी मात केली आहे. जिल्ह्यात ३११५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ८७० स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

............

रिकव्हरी दर ९०.४५ टक्क्यांवर

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने डाऊन होत आहे, तर मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काेरोनाबाधितांच्या रिकव्हरी दरात वाढ झाली आहे. सध्या रिकव्हरी दर ९०.४५ टक्के असून तो राज्याच्या रिकव्हरी दरापेक्षा १ टक्क्याने अधिक आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.

..............

२ लाख २४ हजार नागरिकांना लस

कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ५८४२१ नागरिकांना लसीचा पहिला डोस तर ४४०४२१ नागरिकांना लसीचा डोस देण्यात आला आहे. अशा एकूण २ लाख २४ हजार ४६२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Web Title: The growth of corona is taking a break