आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना; युरियासह खतांचा पुरवठा पंधरा दिवसांपासून ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 20:17 IST2026-03-24T20:15:33+5:302026-03-24T20:17:26+5:30
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी : रब्बी धान उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता

Farmers hit by Gulf War; Supply of fertilizers including urea has been halted for fifteen days
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. खत निर्मितीसाठी कारखान्यांना आवश्यक असलेला गॅस पुरवठा होत नसल्याने खत निर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच मागील पंधरा दिवसांपासून युरियासह इतर खतांचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बी धान उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामात सुद्धा ६५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. यासाठी युरिया, डीएपी व मिश्र खतांची मागणी असते. त्यासाठी जिल्हा कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी खतांचे नियोजन केले होते. रब्बी हंगामासाठी एकूण ८१ हजार २३७ मेट्रिक टन खताची मागणी केली होती. सध्या रब्बी हंगामातील रोवणी आटोपली आहे. दहा-पंधरा दिवसांत धान पिकाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने युरियासह इतर खतांचे नियोजन करून त्याची मागणी केली होती. पण गेल्या पंधरा दिवसांपासून युरियासह इतर खतांचा पुरवठा ठप्प आहे. त्यामुळे खतांचा पुरवठा न झाल्यास शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आखाती देशांत गेल्या २४ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे इंधन पुरवठ्याची साखळी खंडित झाली आहे. याचाच फटका विविध उद्योग आणि व्यवसायांना बसत आहे. खत निर्मिती कारखान्यांना सुद्धा गॅस पुरवठा होत नसल्याने त्याचा परिणाम युरियासह इतर खतांच्या निर्मितीवर झाला असल्याची माहिती आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून खतांचा पुरवठा झाला नसल्याचे गोंदिया जिल्ह्यातील ठोक विक्रेत्यांनी सांगितले. येत्या आठ-दहा दिवसांत जिल्ह्यात युरिया खताचा पुरवठा न झाल्यास रब्बी धान उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खरिपातील ८५८८ टन युरियाचा साठा
गेल्या खरीप हंगामातील युरियाचा ८५८८ मेट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक आहे. तर रब्बीसाठी १७ हजार ७१९ मेट्रिक टन युरियाची गरज आहे. खरिपातील शिल्लक असलेला साठा उपयोगात आणला तरी आणखी १० हजार मेट्रिन टन युरियाची गरज पडणार आहे.
रब्बी हंगामासाठी केलेली खताची मागणी
१७७१९ - मेट्रिकटन युरिया
३९९४९ - मेट्रिक टन एसएसपी
६६५६ - मेट्रिक टन संयुक्त खते
७५६६ - मेट्रिक टन एमओपी
"रब्बी हंगामातील रोवणीची कामे पूर्ण झाली असून, आता पिकाच्या वाढीसाठी युरिया खताची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्याच दृष्टीने खताची मागणी केली आहे. पण आखाती देशांतील युद्धामुळे खत पुरवठ्यावर परिणाम झाला आहे."
- नीलेश कानवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया