भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 21:57 IST2025-09-29T21:56:19+5:302025-09-29T21:57:47+5:30
नातेवाईकांना भेटून जात होते परत

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
अर्जुनी मोरगाव: भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२९) रात्री आठ वाजताच्या सुमारास कोहमारा-वडसा मार्गावर घडली. मुकरू जीवन नाकाडे (वय ६०), मालता मुखरू नाकाडे (वय ५७) रा. कोरंबीटोला असे त्या अपघातामध्ये ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबीटोला येथील मुकरू नाकाडे हे सोमवारी (दि.२९) त्यांच्या दुचाकीने पत्नी मानता नाकाडेसह अर्जुनी मोरगाव येथील नातेवाईकांकडे भेटायला गेले होते. नातेवाईकांची भेटून घेवून रात्री ८ वाजताच्या दरम्यान दोघेही पती-पत्नी त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३५, एम ६३०१ ने अर्जुनी मोरगाव येथून स्वगावी कोरंबीटोला येथे निघाले.
दरम्यान तावशी टी पॉइंटवर वळण मार्गावरून भर धाव ट्रक क्रमांक एपी ३७, टीके १५८९ ने मुकरु नाकाडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघाही पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक ताब्यात घेऊन दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.