तरुणांनो उद्योजक व्हा, रोजगार देणारे बना!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 13:33 IST2026-05-09T13:31:53+5:302026-05-09T13:33:31+5:30
उद्योग संगम कार्यक्रमात लाभार्थ्यांचा सत्कार

तरुणांनो उद्योजक व्हा, रोजगार देणारे बना!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील तरुणांना सक्षम करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना, उपक्रम राबवले जात आहेत. याचा लाभ घेत तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे. गोव्यातील तरुणांनी आता रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बनावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी येथे उद्योग, व्यापार व वतीने वाणिज्य संचालनालयाच्या आयोजित 'पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम नवीन संधी (पीएमइजीपी)' या उद्योग संगम कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी 'पीएमइजीपी' योजनेच्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पीएमइजीपी व आरएएमपी आणि स्वयंपूर्ण गोवा यासारख्या विविध योजनांद्वारे उद्योजकांना आर्थिक सहाय्य, कौशल्य विकास, बाजारपेठेशी जोडणी आणि बीएफसीएस व डब्ल्यूइएफसी मार्फत प्रत्यक्ष मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे गोव्यातील एमएसएमइ क्षेत्र अधिक सक्षम व मजबूत होत आहे.
१३२० उद्योग उभारले
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा युवकांच्या आकांक्षा उद्योगांमध्ये रूपांतरित करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. या योजनेअंतर्गत गोव्यात आतापर्यंत १,३२० हून अधिक सूक्ष्म उद्योग उभारण्यात आले असून, सुमारे १०० कोटींचे बँक कर्ज वितरित करण्यात आले आहे. तसेच ३४.८२ कोटींचे 'मार्जिन मनी' अनुदान देण्यात आले असून जवळपास १२,००० लोकांसाठी रोजगारनिर्मिती झाली आहे. महिला तसेच ग्रामीण भागातील उद्योजकांचा वाढता सहभाग हा सर्वसमावेशक विकासाचा सकारात्मक संकेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.