युवा नेते डॉ. केतन भाटीकर यांचा काँग्रेस प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी आतापासूनच धास्ती घेतली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:33 IST2026-02-25T13:32:27+5:302026-02-25T13:33:24+5:30

गोवा वाचविण्यासाठी मोठा पाठिंबा द्या : माणिकराव ठाकरे यांचे आवाहन

young leader dr ketan bhatikar joins goa congress | युवा नेते डॉ. केतन भाटीकर यांचा काँग्रेस प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी आतापासूनच धास्ती घेतली!

युवा नेते डॉ. केतन भाटीकर यांचा काँग्रेस प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी आतापासूनच धास्ती घेतली!

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: आज विविध कारणांमुळे सरकारविरोधात, गोव्यातील जनतेमध्ये उद्रेक निर्माण झाला आहे. ह्या सरकारने गोवा विकायला काढला आहे की काय? अशी भीती लोकांना वाटू लागली आहे. एकंदरीत गोव्याला नष्ट करण्याचे काम हे सरकार करीत आहे. लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काँग्रेसचे संघटन वाढवूया. गोव्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी काँग्रेसमध्ये असेच सहभागी होत राहावे. शेवटी आम्हाला गोवा व देश वाचवायचा आहे. असे उद्‌गार गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काढले.

युवा नेते डॉ. केतन भाटीकर यांचा मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत काँग्रेस प्रवेश झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन, काँग्रेसचे सरचिटणीस राजेश वेरेकर, पंच विल्मा परेरा, रामकृष्ण जल्मी, अरुण गुडेकर, राजन घाटे, नौशाद चौधरी, वाशिम खान, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

अंजली निंबाळकर म्हणाल्या की, युवकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. म्हणूनच आज मोठ्या संख्येने युवा वर्ग काँग्रेसकडे आकर्षित होत आहेत. या युवकांच्या आधारे आम्ही आज भाजपच्या हुकूमशाही सरकार विरोधात दोन हात करायला तयार झालो आहोत. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी जे तयार आहेत त्यांना काँग्रेस पक्षाची दारे खुली आहेत. माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन म्हणाले की, डॉ. केतन भाटीकर हे नेहमी सामान्य लोकांच्या भल्यासाठी लढत आहेत. त्यांनी आपले काम असेच चालू ठेवावे, असे आवाहन केले.

डॉ. केतन भाटीकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांशी माझी मैत्री आहे, अशा खोट्या अफवा पसरवायला सुरुवात झाली आहे. खरे तर मुख्यमंत्र्यांनी आतापासूनच माझी धास्ती घेतली आहे. म्हणूनच ते लहानसहान योजना घेऊन परत परत फोंड्यात येत आहेत. मागच्या चार महिन्यापासून लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत, हे मुख्यमंत्र्यांना आज कळून आले. जर माझा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला नसता तर कदाचित त्यांना याचा अजूनही विसर पडला असता. प्रशासन असफल ठरत आहे, म्हणूनच त्यांना परत परत फोंड्यात यावे लागते हे मुख्यमंत्र्यांनी मान्य करावे.

काँग्रेसचे फोंड्यातील नेते राजेश वेरेकर यावेळी बोलताना म्हणाले की, फोंडा मतदार संघात काँग्रेस बळकट आहेच आणखीन बलवान करण्यासाठी आम्ही दोघे मिळून काम करू. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गट अध्यक्ष विलियम आगियार यांनी स्वागत केले. तर जॉन परेरा यांनी आभार प्रदर्शन केले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, ज्याप्रमाणे विधानसभेत सर्व विरोधक एकत्र येऊन आम्ही सरकारशी लढा देतो, त्याचप्रमाणे ह्या पोटनिवडणुकीत सर्व विरोधी पक्षानी एकत्रितपणे लढा दिल्यास भाजपचा पराभव अटळ आहे. यासाठी विरोधी पक्षाचे मन वळवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. आज भाजपकडे प्रचंड प्रमाणात पैसा आहे. त्याचा वापर निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. मात्र किरकोळ पैशासाठी तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्याकडे खेळू नका.

आमदार एल्टन डिकॉस्टा म्हणाले की, काँग्रेसची विचारधारा घेऊन आम्ही काम करत राहूया. भ्रष्टाचाराच्या बाबतीत ६० वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते भाजप सरकारने १४ वर्षात करून दाखवले. भ्रष्टाचार थांबला तरच राज्याचा विकास होईल. त्यासाठीच काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेवर यायला हवा. काँग्रेसने निर्माण केलेले सर्व विकून टाकण्यासाठी सरकार धडपडत आहे.

२०२७ ची मुहूर्तमेढ रोवणार

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, भाटीकर हे फक्त गोव्यापुरतेच परिचित नाहीत तर संपूर्ण देशात आज त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा काँग्रेस पक्षाला निश्चित फायदाच होणार आहे. आगामी काळात राज्याची सूत्रे काँग्रेसकडेच राहणार आहेत हे सर्वात अगोदर भाटीकर यांनी हेरले आहे. म्हणूनच ते आज काँग्रेस पक्षात आले आहेत. पूर्ण ताकदीने आम्ही पोट निवडणूक लढवणार आहोत. मागील विधानसभा निवडणुकीत भाटीकर व वेरेकर यांना जी मते मिळाली त्या मतांची बेरीज केले असता, मोठ्या मताधिक्याने आम्ही पोटनिवडणूक जिंकणार आहोत हे स्पष्ट होत आहे. आज जी गर्दी झाली आहे ती पाहून भाजप पक्षातील प्रत्येकजण बिथरला असणार. पोटनिवडणुकीच्या विजयावरच आम्ही २०२७ ची मुहूर्तमेढ रोवणार आहोत.
 

 

Web Title : युवा नेता केतन भाटीकर कांग्रेस में शामिल; मुख्यमंत्री चिंतित!

Web Summary : युवा नेता डॉ. केतन भाटीकर शक्ति प्रदर्शन करते हुए कांग्रेस में शामिल हुए। कांग्रेस नेताओं ने सरकार पर गोवा को बेचने और लोगों को विफल करने का आरोप लगाया। भाटीकर ने कहा कि मुख्यमंत्री उनकी एंट्री से चिंतित हैं, जिसके कारण वे अक्सर फोंडा का दौरा कर रहे हैं।

Web Title : Youth leader Ketan Bhatikar joins Congress; CM worried!

Web Summary : Dr. Ketan Bhatikar joined Congress amidst show of strength. Congress leaders criticized the government, alleging it's selling Goa and failing its people. Bhatikar stated the CM is worried about his entry, prompting frequent visits to Fonda.