काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार? हालचालींना वेग; स्थानिक पातळीवरही बदलाचा हायकमांडचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:51 IST2025-09-27T12:48:06+5:302025-09-27T12:51:25+5:30
पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही निर्णय घेतला तर तो सर्वांना मान्य करावाच लागेल.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार? हालचालींना वेग; स्थानिक पातळीवरही बदलाचा हायकमांडचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरुन अमित पाटकर यांना हटवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पुन्हा गोव्यात प्रदेशाध्यक्षपद बहाल केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, याविषयी विद्यमान प्रदेशाध्यक्ष पाटकर तसेच गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही संपर्क होऊ शकला नाही.
गोवा विधानसभा निवडणुकीला दीड वर्षापेक्षा कमी कालावधी राहिल्याने स्थानिक पातळीवर महत्त्वाचे संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय हायकमांडने घेतल्याची माहिती मिळते. पाटकर यांच्या विरोधात पक्षातच अंतर्गत बंडाळी आहे. त्यांच्याबद्दल केंद्रीय नेतृत्त्वाकडे तक्रारीही पोचलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एनएसयुआयचे गोवा प्रमुख नौशाद चौधरी यांना धक्काबुक्की केल्याचे प्रकरण गाजले होते. नौशाद याने यासंबंधी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडे तक्रार केली होती.
२०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींचे आणखी एक कारण म्हणजे केंद्रीय नेतृत्त्वाला गोव्यात प्रदेशाध्यक्षपदी बहुजन समाजाचा व त्यातल्या त्यात मोठ्या संख्येने असलेल्या भंडारी समाजाचा नेता हवा आहे. गिरीश हे भंडारी समाजाचे असून त्यांच्याकडे तामिळनाडू तसेच अन्य राज्यांची जबाबदारी आहे. अ. भा. काँग्रेस समितीचे ते कायम निमंत्रित आहेत.
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यास या जबाबदाऱ्यांमधून त्यांना मुक्त करावे लागेल. दरम्यान, पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अजून तसा कोणताही निर्णय झालेला नाही. पक्ष श्रेष्ठींकडून आदेश आल्याशिवाय अंदाज बांधणे चुकीचे आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही निर्णय घेतला तर तो सर्वांना मान्य करावाच लागेल.'