चिनी कंपन्यांकडून प्रधानमंत्री निधीसाठी देणगी का घेतली?; गिरीश चोडणकरांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 20:50 IST2020-06-28T20:49:50+5:302020-06-28T20:50:11+5:30
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न केले आहेत.

चिनी कंपन्यांकडून प्रधानमंत्री निधीसाठी देणगी का घेतली?; गिरीश चोडणकरांचा संतप्त सवाल
पणजी: एकीकडे चीनकडूनभारतावर हल्ला होतो आणि दुसरीकडे प्रधानमंत्री निधीसाठी केंद्र सरकार चिनी कंपन्यांकडून पैसे घेते यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न केले आहेत.
पत्रकार परिषदेत चोडणकर म्हणाले की, ‘प्रधानमंत्री मोदी अजूनही चीनकडून घुसखोरी झालीच नाही, असा दावा करीत आहेत. ते लोकांची दिशाभूल करीत आहेत. गेल्या २0 मे रोजी पीएम केअर्स फंडसाठी ९६७८ कोटी रुपये स्वीकारण्यात आले. चीनमधील बड्या कंपन्यांनी या देणग्या दिल्याचा चोडणकर यांचा दावा आहे.
२०१३ साली चीनने घुसखोरी केलेली असताना चिनी कंपन्यांकडून निधी पंतप्रधानांनी निधी स्वीकारला? चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंध असलेल्या वादग्रस्त कंपनीकडून पंतप्रधांनाना ७ कोटी रुपये मिळाले आहेत का? टीक टॉकची मालकी असलेल्या चिनी कंपनीने ३0 कोटी रुपयांची देणगी दिली आहे का? ३८ टक्के चिनी भागिदारी असलेल्या पेटीएमने १०० कोटी रुपये निधीसाठी दिले का?, शिओमी या चिनी कंपनीने निधीसाठी १५ कोटी रुपयांचे आश्वासन दिले आहे का? चिनी ओप्पो कंपनीने १ कोटी रुपयांची देणगी निधीत जमा केली आहे का? तसेच केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय निधीसाठी आलेली रक्कम पीएम केअर्स निधीत वळवली आहे का? वळवली असेल तर ती किती कोटी रक्कम वळविली? भारतीय भूक्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या चीनमधील कंपन्यांकडून देणगीच्या स्वरुपात पंतप्रधान निधी स्वीकारत राहिले तर चिनी फौजांचे आक्रमण झाल्यास ते देशाला संरक्षण कसे देऊ शकणार ? आदी प्रश्न चोडणकर यांनी केले आहेत.
चिनी लष्कराने ताब्यात घेतलेल्या भारतीय प्रदेशाकडे प्रधानमंत्री अजूनही दुर्लक्ष करीत असल्याची टीका चोडणकर यांनी केली आहे. चिनी सैनिकांनी गल्वान खोरे, पँगोग टीएसओ तलाव क्षेत्र, गरम पाण्याचे झरे आणि व्हाय जंक्शनपर्यंत देस्पांग सखल भूक्षेत्र काबीज केले आहे. मात्र मोदी सरकार चीनने घुसखोरी केलेलीच नाही, असे सांगून देशाची दिशाभूल करीत आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी चीनचे चारवेळा केलेले दौरे त्यांचे चीनशी जवळचे संबंध असल्याचे संकेत देतात. तब्बल पाचवेळा चीन दौऱ्यावर जाणारे ते एकमेव प्रधानमंत्री आहेत, असेही चोडणकर यांनी म्हटले आहे.