व्यसनमुक्तीसाठी संगीत, अध्यात्माकडे वळा: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 07:52 IST2025-10-11T07:51:57+5:302025-10-11T07:52:55+5:30
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मानसिक आरोग्यावर कार्यक्रम; 'टेलिमानस'चा लाभ घ्यावा

व्यसनमुक्तीसाठी संगीत, अध्यात्माकडे वळा: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : अलीकडे तरुणवर्ग ड्रग्सच्या विळख्यात सापडत चालला असून, त्यांना या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी वडीलधाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन, तसेच आध्यात्मिक वळण वेळीच देणे आवश्यक असल्याचे मत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मानसिक आरोग्याविषयी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री राणे उपस्थित होते. कार्यक्रमाला आरोग्य सेवा संचालक डॉ. रूपा नाईक, वैद्यकीय अधीक्षक दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र बोरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्य कार्यक्रमानंतर मंत्री राणे यांना विचारलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. ते म्हणाले की, अलीकडे युवावर्ग हा ड्रग्सच्या विळख्यात अडकत चालला आहे. एकदा युवक चुकीच्या मार्गाला लागला की, तो त्यात घसरत जातो, आम्ही असे होऊ देता कामा नये. टेलिमानस उपक्रमातून लोकांना, पालकांना ड्रग्सच्या अपायांबद्दल माहिती देऊन सामूहिक जनजागृती करणे गरजेचे बनले आहे. अध्यात्म, संगीत, कला क्षेत्रात शिकण्यासारखे आणि आत्मसात करण्यासारखे खूप काही आहे. हे पर्याय आम्ही युवकांना दिले पाहिजे, ज्यामुळे ते ड्रग्ससारख्या अपायकारक गोष्टींपासून दूर राहतील.
ड्रग्सविषयी अंमलबजावणी जनजागृती, करताना आम्ही राजकारण, वैयक्तिक मतभेद, धार्मिक वेगळेपणा विसरून एकीने लढा दिला पाहिजे, कारण हा आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. आरोग्यमंत्री राणे यांनी तरुणांना आणि सर्वसामान्यांना
संवाद सुधारण्याचे आणि टेलिमानस सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तरुणांनी त्यांच्या जीवनाचा आदर करावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
ते म्हणाले, की टेलिमानस सेवा सार्वजनिक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी सूचना दिल्या होत्या. त्यांच्या विचारसरणीनुसार राज्यात आम्ही हा उपक्रम सुरू केला. तरुण पिढीसमोर अनेक समस्या आहेत. बऱ्याचदा आपली समस्या सोडवणे आपल्याला कठीण जाते. अशावेळी टेलीमानस उपयोगी ठरते.
समस्या नसतील, तर तुम्ही भाग्यवान
टेलिमानस हा असा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये रुग्णाची गोपनीयता कायम राखली जाते. जेव्हा तुमच्यासमोर कठीण परिस्थिती येते, तेव्हा कोणाशी तरी बोलणे आणि मदत मागणे अत्यंत आवश्यक असते. जर आपण मानसिक दबावाखाली आलो, तर लोकांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती विकसित होऊ शकते, जी अगदीच चुकीची बाब आहे. जर आपल्याजवळ मोठ्या समस्या नसतील, तर आपण भाग्यवान आहोत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. लोकांना अनेक मोठ्या समस्या असून, त्यांच्याशी संवाद साधल्यावरच आपल्याला कळते की आपण इतरांपेक्षा किती भाग्यवान आहोत.
टेलिमानस तणाव कमी करण्यासाठी
मंत्री राणे त्यांच्या वैयक्तिक संघर्षाचा संदर्भ देत सांगितले की आपण हे समजून घेतले पाहिजे की, प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्यातरी टप्प्यावर मदतीची गरज असते. लोकांनी तणाव कमी करण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी टेलिमानससारख्या वैद्यकीय सेवांचा वापर करायला हवा.
एका दृष्टिहीन मुलाचे उदाहरण देत मंत्री राणे म्हणाले की, प्रत्येक वैद्यकीय रुग्णालयात अशी पर्यायी सेवा असायला हवी जिथे दृष्टिहीन व्यक्ती त्यांचे वैद्यकीय अहवाल वाचू शकतील, अशी त्या मुलाची मागणी होती. त्यावर विचार सुरू आहे.
सांगेतील जखमी विद्यार्थिनीची विचारपूस
सांगे येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचे फॉल्स सिलिंग कोसळून जखमी झालेल्या मुलीला हॉस्पिसियोत दाखल केल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी तिची भेट घेऊन विचारपूस केली. मंत्री राणे यांनी पालकांकडे चौकशी केली. त्यांनी इस्पितळाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांना या मुलीकडे जातीने लक्ष देण्याची सूचना दिली. शुक्रवारी सकाळी, माकडांनी विद्यालयाच्या छप्परावर उड्या मारल्याने आतील फॉल्स सिलिंग कोसळले होते. आपचे राज्य निमंत्रक अमित पालेकर यांनीही जिल्हा इस्पितळाला भेट देऊन त्या मुलीची चौकशी केली.