मोदींच्या आगमनाची जोरदार तयारी

By Admin | Updated: June 13, 2014 07:04 IST2014-06-13T07:04:18+5:302014-06-13T07:04:30+5:30

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शनिवारी गोव्यात येत आहेत.

Strong preparation of Modi's arrival | मोदींच्या आगमनाची जोरदार तयारी

मोदींच्या आगमनाची जोरदार तयारी

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या शनिवारी गोव्यात येत आहेत. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षात उत्साह व चैतन्याचे वातावरण आहे. पंतप्रधानांच्या आगमनाची शासकीय व पक्षीय स्तरावरही जोरदार तयारी सुरू आहे.
उद्या सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी दाबोळी विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन होईल. त्यानंतर ते वास्को येथील नौदलाच्या आयएनएस तळावर दाखल होतील. नौदलाच्या किनाराधिष्ठित चाचणी सेवेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल. ही सेवा आशिया खंडात पहिल्यांदाच आणण्यात आली आहे. त्यानंतर पंतप्रधान विक्रमादित्य जहाजालाही भेट देणार आहेत.
दुपारी दीड वाजता पंतप्रधान वास्कोहून दोनापावल येथील राजभवनावर दाखल होतील. राजभवनाच्या प्रवेशद्वारासह अन्यत्र रंगरंगोटी करण्याचे काम सध्या सुरू आहे. सायंकाळी दोनापावल येथील गोवा विद्यापीठाजवळील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाईल. एकूण अकरा हजार कार्यकर्त्यांना बसण्याची सोय स्टेडियममध्ये करण्यात आली आहे. भाजपच्या मंत्री व आमदारांना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणण्याचे काम प्रदेश भाजपने दिले आहे. कला अकादमीत सायंकाळी साडेचार वाजता प्रस्तावित चौपदरी मांडवी पुलाच्या नामफलकाचे पंतप्रधानांकडून अनावरण केले जाईल. सायंकाळी मिरामारच्या मेरियट हॉटेलमध्ये सुमारे दीडशे निमंत्रितांसमोर विचार मांडल्यानंतर तिथून पंतप्रधान दिल्लीला निघणार आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शासकीय यंत्रणेस तयारीच्या दृष्टीने सतर्क केले आहे. शिष्टाचार खाते, पोलीस खाते, वाहतूक खाते सक्रिय झाले आहे. पंतप्रधान गोवा दौऱ्यावेळी गोव्याच्या हिताच्या दृष्टीने कोणत्या घोषणा करतात, याकडे गोमंतकीयांचे लक्ष लागून आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Strong preparation of Modi's arrival