चार हजार बेशिस्त चालकांना पुनर्प्रशिक्षण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:38 IST2026-04-30T12:34:45+5:302026-04-30T12:38:39+5:30
पर्वरी येथील वाहतूक खात्याच्या इमारतीचे उद्घाटन; अपघात टाळण्यासाठी जनजागृतीवर भर

चार हजार बेशिस्त चालकांना पुनर्प्रशिक्षण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर केवळ दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांना सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जात असून, आतापर्यंत ४००७ चालकांना नियमभंगप्रकरणी पुनर्प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी येथे नव्याने उभारलेल्या वाहतूक खात्याच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, वाहतूक संचालक परिमल राय, वाहतूक खात्याचे सचिव महेश कुमार शंभु, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, वाहतूक खाते केवळ दंड आकारण्यापुरते मर्यादित न राहता अपघात टाळण्यासाठी जनजागृती व प्रशिक्षणावर भर देत आहे. चालकांना नियमांचे महत्त्व सांगितले जात आहे.
या प्रकल्पाच्या प्रारंभाचे श्रेय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना देताना मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार सांभाळत असताना त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती. हे केंद्र सुरू झाल्यानंतर वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी होईल, कोंडी कमी होईल आणि रस्ते सुरक्षेत सुधारणा होण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री गुदिन्हो यांनी व्यक्त केला.
'वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न'
नियमांचे भंग करणाऱ्या चालकांना दिलेल्या प्रशिक्षणात नियमांचे पालन, सुरक्षित वेग राखणे, हेल्मेट व आसनपट्टा वापरणे तसेच रस्ते सुरक्षिततेसंबंधी विविध बार्बीचा समावेश आहे. या उपक्रमामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला. वाहतूक खात्यात आधुनिक बदल करण्यात येत असून, जुन्या वाहनांना बाद करण्यासाठी नवीन धोरणही राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध पद्धतींनी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कमांड अँड कंट्रोल सेंटर लवकरच : माविन गुदिन्हो
यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, राज्यातील वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम व तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने वाहतूक खात्याचे 'कमांड अँड कंट्रोल सेंटर' लवकरच सुरू करण्यात येणार आहे. निधीअभावी या प्रकल्पाला काही काळ विलंब झाला होता. मात्र, आता कोणताही अतिरिक्त निधी न घेता हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मार्ग शोधण्यात आला असून, कामाला गती देण्यात आली आहे.