गोव्यात आगामी मुख्यमंत्री भंडारी समाजाचा, साळगावकरांचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 09:09 PM2018-07-09T21:09:42+5:302018-07-09T21:10:53+5:30

Next Chief Minister of Goa, Bhandari community, Salgaokar predicted in Goa | गोव्यात आगामी मुख्यमंत्री भंडारी समाजाचा, साळगावकरांचे भाकित

गोव्यात आगामी मुख्यमंत्री भंडारी समाजाचा, साळगावकरांचे भाकित

Next

पणजी : गोव्यात पुढील मुख्यमंत्री हा भंडारी समाजातील होईल. तुम्हाला भंडारी समाजातील मुख्यमंत्री यापुढे पहायला मिळेल, असे गृहनिर्माण खात्याचे मंत्री व गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते जयेश साळगावकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले.

गोमंतक भंडारी समाजातील दोन गटांचे सोमवारी एकीकरण झाले. त्यानिमित्ताने भंडारी समाजाने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा फॉरवर्डचे मंत्री विनोद पालयेकर, जयेश साळगावकर व रवी नाईक यांनाही बोलावले होते. नाईक पोहचू शकले नाहीत. दोन्ही समाज एकत्र आले असून आता आम्ही एकत्रितपणे काम करू, असे अध्यक्ष अनिल होबळे यांनी जाहीर केले. आमच्या समाजाची लोकसंख्या गोव्यात पाच लाख आहे. समाजाच्या शक्तीकडे कुणी दुर्लक्ष करू शकत नाही, असे होबळे म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी भंडारी समाजातील कुणी मुख्यमंत्री व्हावा असे तुम्हाला वाटत नाही काय असे विचारले असता,  होबळे यांनी हे राजकीय व्यासपीठ नव्हे, येथे सर्व पक्षांचे समर्थक आहेत असे सांगितले. मात्र तुमच्या समाजातील कुणी मुख्यमंत्री व्हावा अशी तुमची इच्छा नाही काय असे विचारताच मंत्री साळगावकर यांनी यापुढे भंडारी समाजातील एखादा नेता मुख्यमंत्री होईल, असे विधान केले. भंडारी समाज बांधवांनी यावेळी टाळ्य़ा वाजवल्या. आपण लहान असल्यापासून या समाजाच्या कार्यासोबत आहे. आपल्या समाजाची प्रगती व्हावी म्हणून मी नेहमीच वावरत आलो, समाजाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये भाग घेत आलो आहे. समाजाचे एकत्रिकरण झाले याविषयी खूप आनंद वाटतो, असे मंत्री साळगावकर म्हणाले. समाजातील ज्या मुलांचे आर्थिकदृष्टय़ा शिक्षण होत नाही, अशा मुलांना समाजाकडून मदत केली जावी, अशी अपेक्षा साळगावकर यांनी व्यक्त केली.

भंडारी समाजात कधीच दुफळी नव्हती. आम्ही कायमच संघटीत होतो, असे मंत्री पालयेकर म्हणाले. भंडारी समाज यापुढेही एकजुटीने कार्य करत राहिल. देशाच्या प्रगतीत हा समाज योगदान देईल, असे श्रीपाद नाईक म्हणाले. एकीकरणासाठी आम्ही कायम प्रयत्न केले. दोन गट होते पण आम्ही एकमेकांची हानी केली नाही. समाजाकडून युवकांनाही वाव देऊन कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे होबळे म्हणाले. फक्रू पणजीकर, उपेंद्र गावकर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. 

Web Title: Next Chief Minister of Goa, Bhandari community, Salgaokar predicted in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा