पारंपरिक कला, नाट्य व नृत्य शिक्षणासाठी नवी योजना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:08 IST2026-05-08T13:07:50+5:302026-05-08T13:08:35+5:30
पुनर्वसन मंडळात २३ पदे भरणार

पारंपरिक कला, नाट्य व नृत्य शिक्षणासाठी नवी योजना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील पारंपरिक कला, नाट्य, संगीत आणि लोकपरंपरा जपण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती व स्टायपेंड योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत कला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३,६०० ते ९,००० रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्याबरोबरच गोव्याचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यावर भर देण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील पुनर्वसन व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी गोवा पुनर्वसन मंडळात विविध श्रेणींतील २३ नवीन पदे कायम तत्त्वावर भरण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तसेच ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी मल्टी-प्रॉडक्ट प्रोसेसिंग सेंटर्ससाठी १ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पुनर्वसन मंडळाचे कामकाज अधिक बळकट करणे आणि पुनर्वसनाशी संबंधित सरकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. "नवीन पदांमुळे मंडळाच्या सेवांमध्ये गुणवत्ता वाढेल आणि लाभार्थ्यांना अधिक सुलभ व परिणामकारक सेवा मिळेल," असे त्यांनी नमूद केले.
मल्टी-प्रॉडक्ट प्रोसेसिंग सेंटर्ससाठी मंजूर करण्यात आलेल्या १ कोटी रुपयांच्या निधीमुळे ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे. स्थानिक उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकरी व स्थानिक उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल, तसेच रोजगारनिर्मितीलाही गती मिळेल. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "गोवा लाइव्हलीहुड फोरमच्या माध्यमातून या प्रोसेसिंग सेंटर्सचे व्यवस्थापन आणि संचालन केले जाईल. यामुळे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोवा राज्य दिव्यांग आयोगाचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात मागील वर्षभरात दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. विशेषतः 'पर्पल फेस्ट'च्या यशस्वी आयोजनाचा उल्लेख करण्यात आला असून, दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, ते पश्चिम बंगाल व आसाममध्ये होणाऱ्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यांनाही उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, राज्यातील नद्या आणि जलाशयांमध्ये मासे मृतावस्थेत आढळल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवश्यक सूचना दिल्या जातील, असे सावंत यांनी सांगितले.
काय आहे योजना
या योजनेत शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम, कथक, लोकनृत्य, गोमंतकीय लोककला, नाट्य, थिएटर, दशावतार तसेच इतर पारंपरिक सादरीकरण कलांचा समावेश करण्यात आला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क आणि स्टायपेंडसाठी ३,६०० ते ९,००० रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे.
राज्यातील युवा कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून येत्या ३० पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभघ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी अहवालाची प्रतीक्षा
साकोर्डा परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीच्या प्रकरणाबाबत पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की वन खात्याकडून सविस्तर अहवाल मागवला असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याबाबत अधिकृत भूमिका मांडली जाईल. वाघिणीच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वन विभागाकडून तपास सुरू आहे. घटनास्थळी वन अधिकारी आणि कर्मचारी यांनी पाहणी केली असून, प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली आहे."
राज्य सरकार कोणत्याही नवीन ऑफशोअर कॅसिनो जहाजाला परवानगी देणार नाही, हे मी यापूर्वीही सांगितले आहे. मांडवी नदीसह गोव्यातील कोणत्याही भागात नवीन कॅसिनो जहाजांची संख्या वाढवली जाणार नाही. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री