राष्ट्रीय स्तरावरही नाव आणि कीर्ती मिळविलेले नेते स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी काल झाली. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षांचा कालावधी उद्या १९ रोजी पूर्ण होत आहे. गोवा भाजपने गेल्या दहा वर्षांत जी स्थित्यंतरे पाहिली, त्यांचा महत्त्वाचा टप्पा मार्च महिन्यात पूर्ण होत आहे. पर्रीकर यांचा राजकीय वारसा प्रमोद सावंत यांच्याकडे आला. पर्रीकर यांच्यानंतर गोवा भाजपचे नेतृत्व डॉ. सावंत यांच्याकडे आले. पर्रीकर यांनादेखील सलग सहा वर्षांचा कार्यकाळ कधी मिळाला नव्हता. सावंत यांना तो मिळाला. शिवाय सावंत यांना सर्वाधिक आमदारांचे संख्याबळ मिळाले आहे.
चाळीस सदस्यीय विधानसभेत ३३ आमदार सावंत यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहेत. विरोधात जे सात आहेत, त्यापैकी एक-दोन आमदार मुख्यमंत्र्यांचे छुपे समर्थक आहेत. एकंदरीत प्रमोद सावंत सर्व अर्थानी लकी ठरलेले आहेत. भाजपचे यापूर्वीचे प्रदेशाध्यक्ष व आताचे प्रदेशाध्यक्ष हे दोघेही त्यांच्यासाठी जवळच्या मित्रासारखेच आहेत. मंत्रिमंडळातील महत्त्वाकांक्षी नेते, त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावू शकत नाहीत. केंद्रातील बहुतेक दिग्गज नेते सावंत यांना साथ देत आहेत. एवढी अनुकूल आणि मस्त, सुरक्षित स्थिती कोणत्याच मुख्यमंत्र्याला गोव्यात मिळाली नव्हती. अशावेळी वारंवार कामानिमित्त दिल्लीवाऱ्या करण्यासाठीदेखील मुख्यमंत्र्यांकडे पुरेसा वेळ आहे. एका अर्थाने टेन्शन फ्री मुख्यमंत्री असे सावंत यांच्या नेतृत्वाचे वर्णन करता येईल.
मुख्यमंत्र्यांची प्रशासनावर पकड आलेली आहेच. प्रशासनाचा गाडा मुख्यमंत्री बऱ्यापैकी पुढे नेत आहेत. शिवाय ते भाजपच्या संघटनात्मक कामातही खूप सहभागी होत आहेत. भाजपच्या सर्व बैठका, सर्व कार्यक्रम, सोहळे यात मुख्यमंत्री भाग घेतात. ही सावंत यांच्या नेतृत्वाची मजबूत बाजू आहे. मात्र पुढील दीड-दोन वर्षांत मुख्यमंत्री सावंत यांना काही उणीवा दूर करून प्रशासन अधिक संवेदनशील बनवावे लागेल. सर्व मंत्र्यांना सक्रिय करून मंत्रिमंडळाची इमेज बदलावी लागेल.
मनोहर पर्रीकर खूप कष्टाने पुढे आले होते. त्यांनी गोव्यात भाजपचा विस्तार केला. त्याची चांगली फळे आताच्या भाजपला व विद्यमान सत्ताधाऱ्यांना मिळत आहेत. एखादा नेता पर्रीकर झाला म्हणून दुसरा नेताही पर्रीकरांसारखाच होईल असे कधी घडत नसते. तशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे असते. काहीजण सोशल मीडियावर पर्रीकरांचे गुणगान गाताना विद्यमान मुख्यमंत्र्यांनाही कोपरखळी मारण्याचा प्रयत्न करतात. विधायक सूचना करता येतात, त्या करायलाच हव्यात; पण पर्रीकरांएवढीच उंची दुसऱ्या एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाला प्राप्त होऊ शकत नाही. प्रत्येकाचा काळ वेगळा असतो.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याएवढी लोकप्रियता दुसऱ्या कोणत्याच नेत्याला बहुजन समाजात लाभली नाही. पर्रीकर त्या लोकप्रियतेच्या जवळपास पोहोचले होते, पण २०१७ साली ते मुख्यमंत्रिपदी बसल्यानंतरच्या काळात झालेल्या तडजोडी काहीजणांचा अपेक्षाभंग करणाऱ्या ठरल्या. अर्थात हा आता इतिहास झाला. विद्यमान मुख्यमंत्री सावंत लवकरच नवा अर्थसंकल्प सादर करतील. पर्रीकर यांनी दयानंद सामाजिक सुरक्षा, लाडली लक्ष्मी, गृह आधार, सायबर एज, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कर्ज अशा अत्यंत लोकप्रिय योजना आणल्या.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी निदान एखादी तरी अशी भारदस्त योजना आणणे गरजेचे आहे. सावंत यांनी कर्मचारी भरती आयोग स्थापन केला हे स्वागतार्ह आहे. या आयोगामार्फत आता नोकर भरती होत आहे. सावंत यांनी जमीन हडप प्रकरण लावून धरले व काहीजणांना तुरुंगातही पाठवले. मात्र सामाजिक कल्याणाच्या गृह आधार, लाडली लक्ष्मी अशा योजना पर्रीकर यांच्याच नावाने ओळखल्या जातात. मध्यंतरी त्या योजनांचे पैसेदेखील वेळेवर मिळत नाहीत, अशी ओरड करण्याची वेळ ज्येष्ठ नागरिक व महिलांवर आली होती. मुख्यमंत्री सावंत यांनी ती अडचण आता कदाचित दूर केली असावी. मात्र एखाद्या कल्याणकारी योजनेशी लोक आपलेही नाव कायमचे जोडतील, मनात कोरून ठेवतील अशी योजना सावंत यांनी आणण्याची गरज आहे. त्यांना तशी संधी आहे.