लईराईचे धोंड आजपासून होणार व्रतस्थ; संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 07:51 IST2026-04-17T07:51:23+5:302026-04-17T07:51:49+5:30
परिसराची शुद्धता राखण्यासाठी शेणपाणी शिंपडले जाते.

लईराईचे धोंड आजपासून होणार व्रतस्थ; संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: गोव्यातील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी लईराई मंदिर येथील जत्रोत्सवानिमित्त आजपासून हजारो धोंड व्रतस्थ झाले. संपूर्ण राज्य भक्तिमय वातावरणात रंगून गेले आहे. पुढील पाच दिवस गावागावांत 'सोवळ्या'चे काटेकोर पालन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शिरगावसह राज्यातील विविध भागांत वाड्या-वस्त्यांवर, नैसर्गिक जलस्रोत, विहिरी तसेच मंदिर परिसरात व्रत आहेत. समूहाने धोंड करत चुडताच्या मंडपात किंवा विशेष उभारलेल्या शेडमध्ये राहून हे व्रतस्थ घरापासून दूर राहतात. या काळात दिवसातून अनेक वेळा स्नान, शुद्धतेचे पालन, फराळाची स्वतंत्र व्यवस्था आणि सामूहिक पूजा अर्चा यामुळे एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती मिळते.
परिसराची शुद्धता राखण्यासाठी शेणपाणी शिंपडले जाते. सोवळ्याचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याने गावकऱ्यांकडूनही विशेष दक्षता घेतली जाते. गटागटाने राहून देवाची सेवा करणे हा विलक्षण अनुभव असल्याचे व्रतस्थ भाविक सांगतात. जत्रेनिमित्त शिरगावात तयारीला वेग आला असून विविध ठिकाणी कमानी उभारणे, पवित्र तळी परिसराची स्वच्छता, होमकुंडासाठी लाकडांची व्यवस्था आदी कामे सुरू आहेत. हजारो धोंड पवित्र स्नानासाठी येणार असल्याने त्या ठिकाणी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
९२ सीसीटीव्ही कॅमेरे
वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वीज, आरोग्य सुविधा यांसह सर्व विभागांकडून समन्वय साधून तयारी केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले की, शासन व जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घ्यावे, मात्र शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.
अशीही सेवा
काही व्रतस्थ भाविक डोक्यावर लाकडांची मोळी घेऊन होमकुंडाभोवती फेरे मारताना दिसत असून या पारंपरिक सेवेमुळे जत्रेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते. एकूणच, लईराई जत्रेमुळे संपूर्ण गोवा भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.