लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यातील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेल्या बीच शॅकचा यंदाचा हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर संपत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील शॅक व्यावसायिकांनी व्यवसाय आवरता घेण्यास सुरुवात केली आहे.
पर्यटकांची घटलेली संख्या, पायाभूत सुविधांचा अभाव आणि दलालांचा वाढता उपद्रव ही यामागची मुख्य कारणे असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जेव्हा गोवा शॅक ओनर्स सोसायटीचे अध्यक्ष क्रूझ कार्दोझो यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'यंदाच्या हंगामाची सुरुवात (सप्टेंबर ते डिसेंबर) अतिशय दमदार झाली होती. मात्र, दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली.
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती, वाढता उन्हाळा, अपुऱ्या सुविधा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर कारणांमुळे विदेशी पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली आहे. उत्तर गोव्यातील कांदोळी-कलंगुट पट्टयातील शॅक मालकांनी आधीच आपले शॅक काढण्यास सुरुवात केली असून, आता दक्षिण गोव्यातील सासष्टी भागातही हेच चित्र दिसत आहे'.
व्यावसायिकांनी प्रशासनाकडे तक्रारी मांडल्या आहेत. बेताळभाटी येथील शॅक व्यावसायिक इनास फर्नाडिस यांनी सांगितले की, समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. अनेक ठिकाणी पर्यटकांना चालत जाण्यासाठीही रस्ते नाहीत, तसेच स्वच्छतागृहे आणि कपडे बदलण्याच्या खोल्यांसारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव आहे.
याशिवाय, किनाऱ्यांवर दलालांचा वाढता वावर आणि काही पर्यटकांकडून होणारी परदेशी पर्यटकांची छळवणूक यामुळे गोव्याच्या पर्यटन प्रतिमेवर विपरित परिणाम होत असल्याचे फर्नाडिस यांनी नमूद केले.
नियोजनबद्ध पर्यटन विकास हवाय
आगामी हंगाम अधिक यशस्वी करण्यासाठी सरकारने व्हिसा प्रक्रियेत सुलभता आणावी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शॅक व्यावसायिकांनी केली आहे. यंदाचा हंगाम संमिश्र राहिला असला तरी, पुढील वर्षी अधिक शाश्वत आणि नियोजनबद्ध पर्यटनासाठी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे मत पर्यटन क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारने याचाही गांभीरपणे विचार करण्याची मागणी होत आहे.
Web Summary : Goa's beach shack season ends prematurely due to dwindling tourists, poor infrastructure, and persistent touts. Shack owners cite a drop in international visitors, inadequate facilities, and harassment impacting Goa's tourism image. Calls for improved infrastructure and streamlined visa processes are growing.
Web Summary : कम पर्यटक, खराब बुनियादी ढांचे और लगातार दलालों के कारण गोवा का बीच शैक सीजन समय से पहले समाप्त हो गया। शैक मालिकों ने अंतर्राष्ट्रीय पर्यटकों में गिरावट, अपर्याप्त सुविधाओं और उत्पीड़न का हवाला देते हुए गोवा की पर्यटन छवि पर प्रभाव डाला। बेहतर बुनियादी ढांचे और सुव्यवस्थित वीजा प्रक्रियाओं की मांग बढ़ रही है।