गोव्यात गँगस्टर सापडणे धोकादायक, पण धक्कादायक नव्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 08:39 IST2025-10-30T08:37:46+5:302025-10-30T08:39:10+5:30
यापूर्वीही अनेक गुन्हेगारांनी घेतला होता राज्यात आश्रय.

गोव्यात गँगस्टर सापडणे धोकादायक, पण धक्कादायक नव्हे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दाऊद इब्राहिम गॅगशी संबंधित असलेला गैंगस्टर दानिश मर्चट उर्फ दानिश चिकना याला एनसीबीकडून अटक होईपर्यंत गोवापोलिसांना काहीच ठावूक नव्हते ही गोष्ट चिंताजनक आहे. परंतु असे गँगस्टर गोव्यात येऊन राहणे, ही गोमंतकीयांसाठी धक्कादायक बाब राहिलेली नाही. कारण यापूर्वी राज्यात गँगस्टर, दहशतवादी आणि नक्षलवादी वगैरे आश्रयाला येऊन राहिल्याचा इतिहास फार मोठा आणि जुनाच आहे.
राज्यात २०१० साली ओरिसातील गँगस्टर राजा आचार्य याला गोव्यात अटक झाली होती. वाँडर बॉय बुधिया सिंग याचा प्रशिक्षक बिरंची दास याची हत्या करून तो गोव्यात येऊन लपला होता. त्याच वर्षी मे महिन्यात संबू बेक या नक्षलवाद्याला म्हापसा येथे अटक करण्यात आली होती. अनेक दरोडे, खून आणि अपहरण प्रकरणात त्याचा सहभाग होता. त्यापूर्वी तारिक अहमद बाटलू या अतिरेक्यालाही अटक करण्यात आली होती. इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेची स्थापना करणारा यासीन भटकळ हा २०११ ते २०१२ या काळात गोव्यात वास्तव्याला होता, हे तपास एजन्सींना तपासातून आढळून आले होते.
आंतरराष्ट्रीय गँगस्टर चार्ल्स शोभराज याला पर्वरी येथे करण्यात आलेली अटक तर खूप जुनी आहे आणि प्रसिद्धही आहे. दिल्लीच्या गोळी गँगचे गँगस्टरही गोव्यात पकडले गेले आहेत तसेच मुंबईचे गँगस्टरही गोव्यातील कॅसिनोत पकडले गेले होते. त्यामुळे देशातील खतरनाक गँगस्टर गोव्यात सापडणे ही चिंताजनक गोष्ट असली तरी धक्कादायक वगैरे मुळीच नाही.
हे गँगस्टर, अतिरेकी, नक्शलवादी गोव्यात आश्रयाला येतात, असेही आतापर्यंतच्या घटनांमुळे आढळून आले आहे. दरम्यान, गँगस्टर गोव्यात आश्रयाला येतात की अजून कोणत्या कामांसाठी ते येथे येतात या बाबतीत निश्चित असे काही सांगता येत नाही, परंतु गोव्यात असे लोक सुरक्षित राहू शकत नाहीत. ते पकडले जातात, असा दावा गोवापोलिसांनी केला आहे.