जिल्हा पंचायत निवडणूक २०२५: भाजपाची पहिली यादी आली; १९ उमेदवारांमध्ये ८० टक्के नवे चेहरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:37 IST2025-12-01T12:36:52+5:302025-12-01T12:37:58+5:30
Goa Zilla Panchayat Election 2025: विरोधकांना युतीसाठी अद्याप मिळेना मुहूर्त

जिल्हा पंचायत निवडणूक २०२५: भाजपाची पहिली यादी आली; १९ उमेदवारांमध्ये ८० टक्के नवे चेहरे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपने १९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, खोर्ली मतदारसंघात सिद्धेश श्रीपाद नाईक यांना पुन्हा तिकीट दिले आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर गोव्यात १३, तर दक्षिण गोव्यात ६ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
वैशिष्ट्य म्हणजे, भाजपने यावेळी ८० टक्के नवे चेहरे दिले असून, सुकूर मतदारसंघात उमेदवारी मिळालेला अमित देवीदास अस्नोडकर हा २३ वर्षीय युवक सर्वात कमी वयाचा उमेदवार आहे. दक्षिण गोव्यात शेल्डे मतदारसंघात सिद्धार्थ गावस देसाई हे एकमेव नाव भाजपकडे होते. पक्षातील सर्वमान्य उमेदवार म्हणून तिकिटासाठी त्यांची निवड झाली.
मडकईतील मोरजीसह दोन मतदारसंघ मगोपला
जि. पं. निवडणुकीसाठी मगोपला तीन जागा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मांद्रे विधानसभा मतदारसंघातील मोरजी व मडकईतील दोन जागांचा यात समावेश आहे. प्रियोळ मतदारसंघातील बेतकी-खांडोळा व वेलिंग प्रियोळ गोविंद गावडेंना दिले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी यास दुजोरा दिला.
भाजप व मगो युतीने ही निवडणूक लढवणार आहे. मगोपचीही तीन जागांबाबत तक्रार नसल्याची माहिती मिळते. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत उर्वरीत यादी जाहीर केली जाणार आहे. पक्षाने बहुतांश उमेदवारांची निवड फायनल केली असल्याचे सांगण्यात आले.
सर्वांत तरुण उमेदवार
प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांच्या सहीने ही उमेदवारी यादी जाहीर झाली असून, त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यावेळी आम्ही ८० नवे चेहरे दिले आहेत. तरुण रक्ताला वाव दिला असून, अमित देवीदास अस्नोडकर हा आमचा सर्वांत कमी वयाचा उमेदवार आहे.
आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारणार
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सोमवारपासून (दि. १) उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ९ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील.
शिक्षिकेला उमेदवारी
उसगाव-गांजे मतदारसंघात उमेदवारी मिळालेल्या समीक्षा वामन नाईक या पेशाने शिक्षिका आहेत. त्या भंडारी समाजाच्या असून, मंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांचे नाव पक्षाकडे पाठवले होते.
उमेदवारांची जिंकण्याची क्षमता, पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा आदी गोष्टी विचारात घेऊनच आम्ही उमेदवार निश्चित केलेले आहेत. ८० टक्के नवे चेहरे आम्ही दिले आहेत. पहिली १९ उमेदवारांची यादी जारी केली असून, दुसरी यादी उद्या, मंगळवारपर्यंत जाहीर होईल. - दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप.
भाजपने मगोला दिलेल्या जागांबाबत माझ्यापर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप आलेली नाही. मगोपला किती जागा मिळणार हे आज सोमवार दुपारपर्यंत स्पष्ट होईल. - दीपक ढवळीकर, अध्यक्ष, मगोप.
भाजपसोबत आम्ही युतीमध्ये सहभागी झालो असल्याने ज्या काही जागा मगोला मिळतील, त्या निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जागा निश्चित झाल्यानंतर मगो केंद्रीय समिती व इतर जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारी संदर्भात निर्णय घेण्यात येतील. दोन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. - मंत्री सुदिन ढवळीकर.