प्रियोळचीही जागा भाजपच लढवणार, मान्य नसेल तर युतीमधून चालते व्हावे; मुख्यमंत्री सावंत यांनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:45 IST2025-03-31T12:43:31+5:302025-03-31T12:45:20+5:30

मगोला कडक इशारा, ढवळीकरांना 'टेन्शन'

cm pramod sawant clearly told mago party that bjp will contest priyol seat too and if not accepted then should be left from the alliance | प्रियोळचीही जागा भाजपच लढवणार, मान्य नसेल तर युतीमधून चालते व्हावे; मुख्यमंत्री सावंत यांनी ठणकावले

प्रियोळचीही जागा भाजपच लढवणार, मान्य नसेल तर युतीमधून चालते व्हावे; मुख्यमंत्री सावंत यांनी ठणकावले

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: प्रियोळ व मांद्रे विधानसभा मतदारसंघ भाजपच लढवणार असून मान्य नसेल तर चालते व्हा, अशा कडक शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मगोच्या नेतृत्वाला ठणकावले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे भाजप-मगो युतीला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे मंत्री गोविंद गावडे यांना हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे.

प्रियोळमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपला युतीची गरज नसल्याचे स्पष्टच सांगितले. ते म्हणाले की, प्रियोळ आणि मांद्रेच्याबाबतीत काडीचीही तडजोड केली जाणार नाही. मान्य नाही तर मगोपने चालते व्हावे. सावंत म्हणाले की, निवडणूक जवळ आल्यावर भूलथापा मारणारे, दुफळी निर्माण करणारे अनेकजण येतील. कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीला आता जास्त कालावधी राहिलेला नाही.' मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'केंद्रात व राज्यात भाजपचे डबल इंजीन सरकार आहे. गोव्यात विकासकामांसाठी केंद्र सरकारने भरभरून निधी दिलेला आहे. कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी राहावे व पोटतिडकीने काम करावे.'

येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायतींच्या व नंतर मार्चमध्ये पालिका निवडणुका होतील व विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागतील. विधानसभेसाठी अनेकजण बाशिंग बांधून तयार आहेत. मी आधीच स्पष्ट केलेय, प्रियोळ व भाजप मतदारसंघ भाजपकडेच राहील. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

मला फरक पडत नाही: डॉ. केतन भाटीकर

दरम्यान, फोंड्यात मगोच्या तिकिटावर रिंगणात उतरण्यास इच्छुक असलेले डॉ. केतन भाटीकर म्हणाले की, "युती असो वा नसो, मला काही फरक पडत नाही. मी फॉड्यात मगोप नेता म्हणून काम करत आहे. मला खात्री आहे की मी पुढील निवडणूक मगोचा उमेदवार म्हणून लढेन आणि नक्कीच जिंकेन."

कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ आले : गोविंद गावडे

प्रियोळचे आमदार तथा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने मला व कार्यकर्त्यांना दहा हत्तींचे बळ प्राप्त झाले आहे. २००७साली लक्ष्मीकांत पार्सेकर प्रदेशाध्यक्ष असताना मी हेच सांगत होतो की, भाजपला मगोपकडे युती करण्याची गरज नाही आणि आता आगामी काळातही युती करण्याची अजिबात गरज नाही. भाजपने निवडणूक स्वबळावर लढवल्यास बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याची ताकद भाजपमध्ये आहे. गेली आठ वर्षे मी गोमंतकीयांसाठी काम करत आहे. भाजपने नेहमीच चांगले प्रशासन दिले आहे. त्यामुळे पक्षाचे स्थान जनमानसात मजबूत झाले आहे.'

कोणाला ब्लॅकमेल करण्याचा प्रश्नच नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, पक्ष संघटन मजबूत करणे व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे. निवडणूक स्वबळावर लढवणे ही कार्यकर्त्यांची पूर्वीपासूनची मागणी आहे. जुने व नवे अशा दोन्ही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. यात कोणाला ब्लॅकमेल करणे किंवा कोणाला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही.

मुख्यमंत्री दिल्लीस रवाना

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत काल रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत ते केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच अन्य नेत्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ पुनर्रचना तसेच अन्य राजकीय विषयावर चर्चा करतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गोवा सरकार ७ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार आघाडीवर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांशी बैठकीत ते या विषयावर चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: cm pramod sawant clearly told mago party that bjp will contest priyol seat too and if not accepted then should be left from the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.