लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : तालुक्यातील तोरसे, मोपा, कडशी, उगवे, तांबोसे आणि परिसरातील गावांमध्ये 'ओंकार' या नर हत्तीच्या वारंवार मानवी वस्तीत होणाऱ्या घुसखोरीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्तीमुळे शेती आणि बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने तातडीने ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करावी, हत्तीला पकडून अभयारण्यात पाठवावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी वन महामंडळाच्या चेअरमन तथा आमदार दिव्या राणे यांची भेट त्यांना निवेदन दिले. राणे यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. चर्चेदरम्यान 'ओंकार' हत्तीला बोंडला वन्यजीव अभयारण्य येथे किंवा पर्यायाने वनतारासारख्या पुनर्वसन केंद्रात हलवण्याचे पर्याय सुचवण्यात आले.
नागरिकांकडून वन विभागालाही लेखी निवेदन देण्यात आले आहे. नागरिकांनी सांगितले की, हत्तीने जंगलाच्या पारंपरिक सीमा ओलांडून गावांमध्ये मुक्तपणे वावर सुरू केला आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, काही ठिकाणी वाहनांचेही नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी, परिसरात सतत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे निवेदन भास्कर नारुलकर, विनायक महाले, कृष्णकांत नाईक, अॅड. जितेंद्र गावकर, संजू आरोस्कर आणि सागर यांच्या प्रतिनिधी मंडळाने प्रधान मुख्य वनसंरक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
मानवी जीवितहानी होण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संपूर्ण परिस्थितीवर वन विभाग नेमकी कोणती ठोस कार्यवाही करणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
'जीवितहानी होण्यापूर्वीच कारवाई करा'
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. 'ओंकार' हत्तीला सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन कायमस्वरूपी स्थलांतर करणे, त्याला नियंत्रित व सुरक्षित वातावरणात ठेवण्यासाठी विशेष पुनर्वसन केंद्रात हलवणे, तसेच या प्रक्रियेसाठी वन्यजीव तज्ज्ञ व संबंधित संस्थांशी समन्वय साधणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
ड्रोन बंदीमुळे अडचणी वाढल्या
विशेषतः काजू, नारळ आणि भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. हत्तीला पुन्हा जंगलात हाकलण्याचे प्रयत्न वारंवार अपयशी ठरत असल्याने तो पुन्हा पुन्हा वस्तीत प्रवेश करत असल्याचे दिसून येते. दरम्यान, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन वापरावर असलेले निर्बंध हे वन विभागाच्या हालचालींसाठी अडथळा ठरत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
Web Summary : Fear grips Pedne as 'Omkar' the elephant repeatedly enters villages, damaging crops. Locals urge relocation to Bondla sanctuary or Vanatara. Drone ban hinders forest department efforts.
Web Summary : पेडने में 'ओंकार' हाथी के बार-बार गांवों में घुसने से दहशत है, फसलें नष्ट हो रही हैं। स्थानीय लोग बोंडला अभयारण्य या वनतारा में स्थानांतरित करने का आग्रह करते हैं। ड्रोन प्रतिबंध से वन विभाग के प्रयासों में बाधा आ रही है।