मुंबई - मानखुर्द येथे उड्डाणपुलाच्या कामात बोअरिंग मशीन क्रेन कोसळून झालेल्या अपघातात पोलिस हवालदार संतोष चव्हाण यांचा मृत्यू आणि अभूतपूर्व वाहतूक कोंडीत हजारो नागरिकांचे बुधवारी-गुरुवारी प्रचंड हाल होऊनही राजकीय नेते, महापौर रितू तावडे, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकलेही नाहीत. चव्हाण यांना महापालिका व शासनानेही मदत जाहीर केली नाही किंवा कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल कारवाईही झालेली नाही. त्या तुलनेत मुलुंड येथे स्लॅब कोसळून झालेल्या अपघातप्रकरणी एमएमआरडीएने त्याच दिवशी कंत्राटदारावर कारवाई केली होती आणि मृताच्या वारसांना मदत जाहीर करण्यात आली होती. मानखुर्द अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचे निधन झाले आहे. महापालिका मात्र मानखुर्द प्रकरणी दोषींवर कारवाई आणि मदतीबाबत तूर्तास थंडच आहे.
या अपघातामुळे चेंबूर ते मानखुर्द हे १५ मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनांना अख्खी रात्र वाट पहावी लागली. हजारो नागरिक वाहतूक कोंडीत अडकले आणि त्यांना पिण्याचे पाणी मिळणे किंवा बाथरूम-टॉयलेटला जाणेही मुश्कील झाले होते. या मार्गावर गुरुवारीही वाहतूक कोंडीचे चित्र होते. महापालिकेच्या कामात अपघात होऊनही पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, महापौर व अन्य पदाधिकारी आणि अन्य राजकीय नेते मदत व पाहणीसाठी घटनास्थळी फिरकलेही नाहीत. पालिकेने कंत्राटदारावर तातडीने कारवाईही केलेली नाही. पालिकेच्या या उदासीनतेबाबत संताप व्यक्त होत आहे.
एमएमआरडीएची तत्पर कारवाईमुलुंड येथे मेट्रो कामाचा स्लॅब रिक्षावर कोसळून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अपघातात उत्तर प्रदेशातील रामधन यादव यांचा मृत्यू झाला होता आणि तीन जण जखमी झाले होते. एमएमआरडीएने त्याची गंभीर दखल घेऊन त्याच दिवशी कंत्राटदाराला पाच कोटी रुपये तर सल्लागारांना एक कोटी रुपयांचा दंड केला होता. त्याचबरोबर राज्य शासनानेही १० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.
मानखुर्द प्रकरणी उदासीनता का ?मानखुर्द येथील अपघातामध्ये पोलिस हवालदाराला जीव गमवावा लागला असून, कंत्राटदारावर कारवाई झालेली नाही आणि हजारो नागरिकांचे वाहतूक कोंडीत प्रचंड हाल होऊनही राजकीय नेते किंवा महापालिकेने साधी दिलगिरीही व्यक्त केलेली नाही. हवालदार यांच्या वारसांना आर्थिक मदत व सांत्वनाबाबतही प्रशासन आणि नेतेमंडळी उदासीन आहेत.
सध्या मुंबईमध्ये अडीच लाख कोटींची काम सुरु आहेत. पूर्ण शहर चालू असताना विशेषतः दाट वाहतूक असलेल्या कॉरिडॉरमध्ये ही कामे सुरु आहेत. अशा परिस्थितीत अपघात टाळण्यासाठी कठोर सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे. अशा घटना घडल्या तर काॅन्ट्रॅक्टरवर कठाेर कारवाई केली जाते. झालेली घटना वाईट आहे. कारवाई करायला महापालिका सक्षम आहे. - डाॅ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए
मुलुंडच्या घटनेतील मृताच्या नातेवाइकास मदत, इथे मात्र पाेलिसाच्या मृत्यूनंतरही भरपाईचा निर्णय नाही
मानखुर्द प्रकरणात दोषी कोण, हे समोर आलेले नाही. तसेच दुर्घटनेत मृत पोलिसाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. या प्रकरणी पालिकेच्या पूल विभागाने आपला अहवाल पालिका प्रशासनला सादर केला असून त्यात सबंधित क्रेनची वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारावर ठपका ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्याबाबतचा अहवाल अजून सार्वजनिक करण्यात आलेला नाही. पालिकेच्या पूल विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट दिली, मात्र पालिकेतील कोणताही जबाबदार लोकप्रतिनिधी फिरकल्याचे दिसले नाही.
Web Summary : Manhurd accident reveals civic apathy after a fatal crane collapse. Officials absent, no immediate aid for victim's family, contrasting MMRDA's swift action in a similar Mulund incident. Public outrage rises over inaction.
Web Summary : मानखुर्द दुर्घटना में घातक क्रेन गिरने के बाद नागरिक उदासीनता उजागर हुई। अधिकारी अनुपस्थित, पीड़ित परिवार के लिए तत्काल कोई सहायता नहीं, मुलुंड की घटना में एमएमआरडीए की त्वरित कार्रवाई के विपरीत। निष्क्रियता पर जनता का आक्रोश बढ़ रहा है।