Join us
Daily Top 2Weekly Top 5

७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 05:42 IST

कंत्राटदाराची ७० टनाची क्रेन उचलण्यासाठी घटनास्थळी हाेती पालिकेची १३ टनाची क्रेन

मनीषा म्हात्रे मुंबई - सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी कंत्राटदाराच्या ७० टनाच्या बोअरिंग मशीन क्रेनद्वारे पिलरचे खोदकाम सुरू असताना ती उचलण्यासाठी केवळ १३ टन वजनाची क्रेन घटनास्थळी होती. अपघातग्रस्त क्रेन हटविण्यासाठी मागविलेल्या २०० टनाच्या दोन क्रेन  दुसऱ्या दिवशी सकाळी आल्या. त्यांच्या मदतीने अर्ध्या तासात अपघातग्रस्त क्रेन हटविण्याचे दावे पालिका अधिकारी व कंत्राटदाराच्या अभियंत्यांनी केल्याने पोलिसांनी कामासाठी ग्रीन सिग्नल दिला. पण अभियंत्याचा अंदाज चुकला. क्रेन भुसभुशीत मातीत अडकून काम पूर्ण होण्यास सहा ते सात तास लागले आणि वाहतुकीचे तीनतेरा वाजले, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. वाशीच्या दिशेने टाटा पॉवर हाऊसच्या समोर मंगळवारी रात्री पावणे दहा वाजता मानखुर्द क्रेन अपघातानंतर ७० टन वजनाच्या ड्रिलिंग क्रेनचा काही भाग बॅरिकेट्स तोडून रस्त्याबाहेर आला. घटनेनंतर वाहतूक व मानखुर्दचे पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी बॅरिकेट्स पुढे घेत, तीन लेनची वाहतूक दोन लेनमध्ये सुरू ठेवली.

पर्यायी व्यवस्थेत गंभीर त्रुटीअपघातग्रस्त क्रेनला हटविण्यासाठी पर्यायी दुसरी क्रेन जवळपास असणे गरजेचे असतानाही फक्त १३ टन वजनाची क्रेन रस्त्याच्या कडेला उपलब्ध होती. तिने ही क्रेन उचलणे शक्य नव्हते. दोनशे टनाची क्रेन रात्री उपलब्ध न झाल्याने दुसऱ्या दिवशी क्रेन येताच पालिका अधिकारी आणि कंत्राटदाराच्या इंजिनिअरने अवघ्या अर्ध्या तासात काम पूर्ण होईल” असा दावा केला. पोलिसांनीही त्यावर विश्वास ठेवून काम करण्यास हिरवा कंदील दिला आणि हे काम दुसऱ्या दिवशी पूर्ण झाले.

इंजिनीअर कुठे होते? एकीकडे हजारो वाहने ज्या उड्डाणपुलावरून जातात, त्याठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या जागी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व योग्य आहे की नाही? याची खबरदारी घेणे गरजेचे होते. त्यासाठी दोन पालिका इंजिनअरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ७० टन वजनाची क्रेन एका भुसभुशीत जागेवर उभी आहे? याचीही जाणीव तेथील अधिकाऱ्यांना कशी झाली नाही? हा प्रश्नच आहे. तसेच पालिकेचे इंजिनीअर देखील घटना घडली तेव्हा तिथे नसल्याची माहिती मिळत आहे.  पोलिसांनी फक्त कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. मात्र, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यावर नेमकी कुणाची कृपा? असाही सवाल येथे उपस्थित होत आहे. त्यामुळे तपास कुठपर्यंत जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

प्रचंड वाहतूककोंडी का झाली ?अपघातग्रस्त ड्रिलिंग मशीन व क्रेन हटविण्यासाठी बुधवारी दुपारी विरुद्ध दिशेने १:३० वाजता  दोन २०० टनच्या क्रेन अखेर घटनास्थळी आणण्यात आल्या. पण त्यासाठी वाहतूक तीन ऐवजी एकाच लेनवरून सुरू ठेवावी लागली. पुढे सुरक्षेच्या दृष्टीने तीन वाजता काही अंतरावर दोन्ही मार्गांवरील वाहतूक थांबविण्यात आली आणि काम सुरू झाले. मात्र, काम सुरू झाल्यानंतर नवीन अडचण समोर आली. 

क्रेनचा एक भाग भुसभुशीत मातीत खोलवर अडकला होता. त्यामुळे ती बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले. शेवटी ड्रिलिंगचा भाग कापून वेगळा करण्यात आला आणि रात्री १० वाजता क्रेन उभी करण्यात यश आले.  त्यानंतर मातीत रुतलेला ड्रिलिंगचा अवाढव्य पार्टही बाहेर काढून बाजूला ठेवला. मात्र तोपर्यंत अर्ध्या तासांचे ६ ते ७ तास उलटल्याने वाहतूक पोलिसांचे व्यवस्थापन कोलमडले. जसजशी वेळ पुढे गेली तसे नागरिकांचा संयम सुटत गेला. 

भीषण वाहतूक कोंडीमुळे बुधवारी रात्री राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या सुमारे १९ बस अडकून पडल्या, परिणामी शेकडो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. सायन-पनवेल महामार्गावरील या कोंडीमुळे अनेक प्रवासी ४ ते ६ तास बसमध्येच अडकून राहिले. बुधवारी संध्याकाळी ६ ते रात्री १० दरम्यान मुंबईतून सुटलेल्या बसना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसला. यात मुंबई सेंट्रलच्या १२ आणि कुर्ला आगाराच्या ७ बस अडकल्या. काही बस नियोजित वेळेपेक्षा तब्बल १२ तास उशिरा पाेहाेचल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Poor planning causes massive traffic jam on Sion-Panvel highway.

Web Summary : A 70-ton crane mishap on the Sion-Panvel highway caused a massive traffic jam due to inadequate equipment and planning. A smaller crane was initially used, and delays in bringing a larger crane led to hours of disruption. Passengers faced severe inconvenience.
टॅग्स :अपघातमुंबई महानगरपालिका