माविन गुदिन्हो यांना मंत्रिपदावरून हटवण्यास २४ तासांची मुदत; मडगाव, वास्कोत पोलिस स्थानकांवर मोर्चे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 09:51 IST2026-04-24T09:50:55+5:302026-04-24T09:51:11+5:30

गौतम खट्टरच्या अटकेसाठी गोवा बंदचा इशारा

24 hours to remove mauvin godinho from the ministerial post protest at police stations in Madgaon and Vasco | माविन गुदिन्हो यांना मंत्रिपदावरून हटवण्यास २४ तासांची मुदत; मडगाव, वास्कोत पोलिस स्थानकांवर मोर्चे

माविन गुदिन्हो यांना मंत्रिपदावरून हटवण्यास २४ तासांची मुदत; मडगाव, वास्कोत पोलिस स्थानकांवर मोर्चे

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा अपमान करणाऱ्या गौतम खट्टर याला शुक्रवारी सायंकाळपर्यंत अटक करावी आणि माविन गुदिन्हो यांना ताबडतोब मंत्रिपदावरून काढून टाकावे या मागणीसाठी येथील लोहिया मैदानावर गुरुवारी शेकडो लोकांनी एकत्र येत मेणबत्ती रॅली काढली. खट्टरवर तातडीने अटकेची कारवाई आणि गुदिन्हो यांना पदावरून हटवले नाही तर गोवा बंद करू, असा इशारा आंदोलकांनी मडगाव पोलिस मुख्यालयासमोर दिला.

वास्को येथील एका कार्यक्रमातील वक्ता गौतम खट्टर सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर प्रक्षोभक टीका केल्याने ख्रिस्ती समाज, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षांनी गुरुवारी आंदोलन केले. शेकडो लोक लोहिया मैदानावर एकवटले. तेथून मडगाव पोलिस मुख्यालयापर्यंत मेणबत्ती फेरी काढण्यात आली. गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई, माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा, मिकी पाशेको, सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी, प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकोणकर, मेशू डिकोस्ता, तनोज अडवलपालकर यांसह अनेकजण उपस्थित होते. माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा म्हणाले की, 'केवळ कँडल मार्च काढून किंवा सहानुभूती दाखवून हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी ठोस कारवाईची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान, अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले की, जर मातिन गुदिन्हो यांना शुक्रवारी, ५ वाजेपर्यंत मंत्रिमंडळातून हटवले नाही आणि गौतम खट्टरला अटक केली नाही तर गोवा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोहिया मैदानावरून सुमारे १२०० आंदोलकांनी शांततेत पोलिस मुख्यालयापर्यंत मेणबत्ती फेरी काढली. आंदोलकांनी पोलिसांवर, खट्टर याला अटक करण्यास उशीर का केला जात आहे, अशी विचारणा करत प्रश्नांचा भडिमार केला. आंदोलकांनी मागण्या पूर्ण न झाल्यास गोवा बंद करण्याचा इशारा दिला.

लोकांनी एकत्र येथ टिळक वास्को येथे सकाळी शेकडो मैदानावरून वास्को पोलिस स्थानकावर मोर्चा काढला. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो यांना हटवण्यासह आयोजकांवर तातडीने गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली. ठोस कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

मंत्र्यांनी का रोखले नाही ? सरदेसाई

प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार विजय सरदेसाई म्हणाले, 'वास्कोतील परशुराम जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजक आणि वक्ते गौतम खट्टर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्याची गरज आहे. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, ज्यावेळी हे घडत होते, तेव्हा मंत्री माविन गुदिन्हो मंचावर उपस्थित होते. मंत्र्यांनी संबंधित व्यक्तीला रोखण्याऐवजी तिथे उपस्थित राहून एकप्रकारे पाठिंबाच दिला. असे प्रकार तिथेच रोखणे हे मंत्र्याचे कर्तव्य असते, कारण तो मंत्रिमंडळाचा जबाबदार घटक असतो. मंत्र्यांचे मौन हे असल्या प्रकारांना सरकारचे समर्थन असल्याचेच निदर्शक ठरते.'

गौतम खट्टरसह आयोजकांना अटक करा : वास्कोत एल्गार

सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सनातन महासंघाचे संस्थापक गौतम खट्टर यांना तातडीने अटक करावी अशी मागणी करत गुरुवारी शेकडो नागरिकांनी पोलिस स्थानकावर मोर्चा काढला. टिळक मैदानाबाहेर जमलेल्या संतप्त नागरिकांनी पोलिसांसमोर रोष व्यक्त केला. यावेळी खासदार विरियातो फर्नांडिस, सामाजिक कार्यकर्ते राम काणकोणकर, शंकर पोळजी यांच्यासह माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा आदी उपस्थित होते. टिळक मैदानाबाहेरून मोर्चा सुरू झाला. पोलिस स्थानकाबाहेर आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली. मुरगावचे मामलेदार प्रविणजय पंडित यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
 

Web Title : मंत्री गुदिन्हो को हटाने की चेतावनी; पुलिस स्टेशनों पर प्रदर्शन

Web Summary : मंत्री गुदिन्हो को हटाने और गौतम खट्टर को गिरफ्तार करने की मांग को लेकर मडगांव और वास्को में प्रदर्शनकारियों ने मार्च किया, मांगें पूरी न होने पर गोवा बंद की धमकी दी। प्रदर्शनकारियों ने खट्टर और मंत्री के खिलाफ तत्काल कार्रवाई की मांग की।

Web Title : Ultimatum to Remove Minister Gudinho; Protests at Police Stations

Web Summary : Demanding Minister Gudinho's removal and Gautam Khattar's arrest for insulting Saint Francis Xavier, protestors marched in Madgaon and Vasco, threatening a Goa shutdown if demands aren't met. Demonstrators demanded immediate action against Khattar and the minister.