आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 14:22 IST2026-04-24T14:20:21+5:302026-04-24T14:22:07+5:30
Breast Cancer: स्तन कर्करोगाच्या निदानासाठी आता केवळ पाच मिनिटांत तपासणी करणे शक्य होणार आहे.

आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: स्तन कर्करोगाच्या निदानासाठी आता केवळ पाच मिनिटांत तपासणी करणे शक्य होणार आहे. केईएम रुग्णालयात अत्याधुनिक थ्रीडी डिजिटल टोमोसिंथेसिस मॅमोग्राफी मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे स्तन कर्करोगाचे अतिशय प्राथमिक टप्प्यात निदान करणे शक्य होणार आहे.
ही अत्याधुनिक कर्करोग निदान यंत्रणा आयसीआयसीआय फाउंडेशनच्या साहाय्यातून रुग्णालयाला मिळाली आहे. यापूर्वी असे तंत्रज्ञान केवळ काही पंचतारांकित रुग्णालये आणि टाटा कॅन्सर स्मारक रुग्णालयातच होते. आता ही मशीन केईएममध्ये बसवल्याने सर्वसामान्य रुग्णांना काहीसा दिलासा मिळेल.
सूक्ष्म गाठींचे अचूक निदान
मशीनद्वारे स्तन कर्करोगाच्या ७० मायक्रॉन एवढ्या सूक्ष्म गाठींचेही अचूक निदान करता येते. पारंपरिक टुडी तंत्रज्ञानाच्या तुलनेत आता सुमारे १५ महिने आधीच कर्करोगाचे निदान करणे शक्य असल्याने उपचार लवकर सुरू करता येतील आणि रुग्णाची पूर्णपणे रोगमुक्त होण्याची शक्यता वाढेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बायोप्सी प्रक्रिया केवळ १३ मिनिटांत
मशीनमुळे किरणोत्सर्गाचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांनी कमी होते. रुग्णाला तपासणीदरम्यान त्रासही कमी होतो. तसेच बायोप्सी प्रक्रिया केवळ १३ मिनिटांत पूर्ण करता येते. आधीपेक्षा तुलनेने ही प्रक्रिया जलद होते. कॉन्ट्रास्ट एन्हान्स्ड डिजिटल मॅमोग्राफी’ तंत्रामुळे तरुण महिलांमधील स्तन कर्करोगाचे निदान अधिक प्रभावीपणे करता येते. ज्यामुळे एमआरआयची गरज कमी होऊन वेळ आणि खर्चाची बचत होते.
अचूक निदानासाठी ‘एआय’ची मदत
या मशीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) समावेश आहे. रेडिओलॉजिस्टना अधिक अचूक निदान करण्यात एआय मदत करते. या संदर्भात क्ष-किरण विभाग प्रमुख डॉ. हेमांगिनी ठक्कर म्हणाल्या की, ४० वर्षांनंतर प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा ही तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबात स्तन कर्करोगाचा इतिहास असल्यास ३५ वर्षांनंतर नियमित अशी तपासणी करणे आवश्यक आहे.
कर्करोगाविरुद्धच्या लढ्याला बळ
केईएम रुग्णालयात २००९ पासून “स्तनशुश्रूषा” विभागाद्वारे बाह्य व आंतररुग्ण सेवा देण्यात येते. या नव्या यंत्रामुळे स्तन कर्करोगाविरुद्धच्या लढ्याला आणखी बळ मिळणार आहे.