जि.प. अध्यक्षांचा ‘रॉबिनहूड’ स्टाईल दणका

By Admin | Updated: January 8, 2015 22:54 IST2015-01-08T22:54:40+5:302015-01-08T22:54:40+5:30

गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम उर्फ प्रशांत कुत्तरमारे सध्या जिल्ह्यात रॉबिनहूड बनले आहेत. त्यांनी दुर्गम व अतिदुर्गम भागात गुप्त दौरे सुरू केले असून या दौऱ्यांच्यानिमित्ताने जि.प.

Zip President's RobinHood Style Dunk | जि.प. अध्यक्षांचा ‘रॉबिनहूड’ स्टाईल दणका

जि.प. अध्यक्षांचा ‘रॉबिनहूड’ स्टाईल दणका

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम उर्फ प्रशांत कुत्तरमारे सध्या जिल्ह्यात रॉबिनहूड बनले आहेत. त्यांनी दुर्गम व अतिदुर्गम भागात गुप्त दौरे सुरू केले असून या दौऱ्यांच्यानिमित्ताने जि.प. अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील तालुका व गावपातळीवरच्या कार्यालयातील अनागोंदी प्रकर्षाने समोर आली आहे. त्यामुळे अध्यक्षांचा दणका साऱ्या प्रशासकीय व्यवस्थेत चर्चेचा विषय ठरला आहे.
२१ मार्च रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर आचारसंहितेत बराच कालावधी निघून गेला. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्या कामाला झंझावती सुरूवात केली आहे.
मुलचेरा तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या कुत्तरमारे यांचा अहेरीत मुक्काम असतो. त्यामुळे त्यांनी अहेरी उपविभागातील मुलचेरा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांना भेटी देण्यासाठी गोपनिय दौरे सुरू केले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी एटापल्ली, भामरागड पंचायत समितीला भेट दिली. यावेळी त्यांना अनेक विभागप्रमुख व कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. एक नव्हे तर दोन-दोन दिवस अधिकारी विनाअर्ज कार्यालयात अनुपस्थित राहतात, हेही चित्र ‘याच देही याची डोळा’ अध्यक्षांनी अनुभवले. आरोग्य व शिक्षण हे दोन विभाग जिल्हा परिषदेत नेहमी वादग्रस्त राहिले आहेत. या विभागातील कर्मचारी मुख्यालयी राहत नाही, अशा तक्रारी असतात. मुख्यालयी हजर न राहता, शेजारच्या मोठ्या गावातून ये-जा करणारे वेळेवर कार्यालयात पोहोचत नाही, असे अध्यक्षांनी शाळांना भेटी दिल्यावर दिसून आले.
जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील शाळेवर केवळ सहा विद्यार्थ्यांकरीता दोन शिक्षक उपलब्ध करण्यात आले आहेत. पहिला चार दिवस आणि दुसरा चार दिवस शाळेत उपस्थित राहत असतो, असे अनेक नमुनेदार उदाहरणे अध्यक्षांनी गेल्या सात-आठ महिन्यांत अनुभवले आहे.
मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली, सुंदरनगर, अहेरी तालुक्यातील महागाव, भामरागड तालुक्यात आरेवाडा आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी दिल्या. येथेही अनेक कर्मचारी, डॉक्टर हजर नसल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आले. एटापल्ली पंचायत समितीला भेट दिल्यावर प्रत्यक्ष कर्मचारी दिसून आले नाहीत. त्यांनी लगेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली व या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे सांगितले. त्या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याची कारवाई करण्यात येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Zip President's RobinHood Style Dunk