रोवणीसाठी कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडले

By Admin | Updated: July 26, 2015 02:40 IST2015-07-26T02:40:20+5:302015-07-26T02:40:20+5:30

मृग नक्षत्रात चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर तब्बल एक ते दीड महिना पावसाने दडी मारली.

Water for Kanammvar reservoir for irrigation | रोवणीसाठी कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडले

रोवणीसाठी कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडले

मजुरांची लगबग : चामोर्शी तालुक्यात आतापर्यंत ७०० मिमी पाऊस
चामोर्शी : मृग नक्षत्रात चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर तब्बल एक ते दीड महिना पावसाने दडी मारली. परिणामी शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले धानाचे पऱ्हे पाण्याअभावी करपायला लागले. तसेच पावसाअभावी रोवणीचे कामे खोळंबले होते. चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचाई विभागाकडे रोवणीच्या कामासाठी कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी केली. अखेर सिंचाई विभागाने गुरूवारपासून शेतकऱ्यांच्या रोवणीच्या कामासाठी कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडणे सुरू केले आहे. यामुळे रेगडी परिसरातील धान पिकाच्या रोवणीला वेग आला आहे.
जुलै महिन्यात काही दिवस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर मधल्या आठवड्यात तालुक्यात काही प्रमाणात पाऊस झाला. तसेच नदीजवळ असलेल्या शेतकऱ्यांनी मोटारपंपाच्या सहाय्याने पऱ्ह्यांना पाणीपुरवठा करून रोवणीची कामे हाती घेतली आहे. तर काही शेतकरी तळे, बोडी, नाले व विहिर आदी स्त्रोतातून मोटारपंपने पाणीपुरवठा करून रोवणीची कामे सुरू केली आहे.
यंदा २०१५-१६ च्या खरीप हंगामात चामोर्शी तालुक्यातील जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी धानाच्या संकरित वाणाची लागवड केली आहे. मात्र काही भागात धानपिकाच्या पऱ्ह्यांवर लष्करी अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे यंदा दोन टप्प्यात रोवणीचे काम होणार असल्याची शक्यता आहे. चामोर्शी तालुक्यात जून महिन्यापासून तर आतापर्यंत एकूण सरासरी ७०० मिमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Water for Kanammvar reservoir for irrigation