संख्याबळ असल्याचा दोनही गटाचा दावा

By Admin | Updated: September 20, 2014 23:49 IST2014-09-20T23:49:14+5:302014-09-20T23:49:14+5:30

५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी २१ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यावर दोनही पक्षाकडून भर दिला जात आहे.

Two groups claim to be in power | संख्याबळ असल्याचा दोनही गटाचा दावा

संख्याबळ असल्याचा दोनही गटाचा दावा

जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक
गडचिरोली : ५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी २१ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यावर दोनही पक्षाकडून भर दिला जात आहे. राष्ट्रवादीला अध्यक्ष पद व काँग्रेसला उपाध्यक्ष पद अशा फॉर्म्युल्यावर रात्री उशीरापर्यंत चर्चा सुरू होती. विविध पक्षाचे उमेदवार फुटल्यामुळे सत्तेसाठी लागणारे संख्याबळ आपल्याकडे असल्याचा दावा सर्वच गट करीत आहे. त्यामुळे मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. बहूमतासाठी लागणारे २६ सदस्यांचे संख्याबळ दोनही गट कसे जमवते यावरच जिल्हा परिषदेची निवडणूक अवलंबून राहणार आहे.
गेल्यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, युवाशक्तीच्या मदतीने सत्तेची मोट बांधण्यात आली होती. यावेळी भाजपमधून तीन सदस्य फुटलेले आहेत. युवाशक्ती आघाडीही अभंग राहिलेले नाही. काँग्रेसचेही सदस्य वेगवेगळ्या गटात विभाजीत आहे. त्यामुळे सत्ता समिकरण बदलण्याची चिन्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून दोन गट आमनेसामने उभे ठाकणार आहेत. काँग्रेस पक्षाचे १३ सदस्यांपैकी ७ सदस्य एका बाजुला असून उर्वरित सदस्य आपआपल्या समर्थक गटाकडे गेलेले आहे. राज्यपातळीवर शिवसेना, भाजप, नाविस यांची आघाडी विधानसभेसाठी होणार असल्याने स्थानिक निवडणुकीतही ही आघाडी टिकून राहिल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. भाजपचे तीन सदस्यही फुटले आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष नेमके कोण होतात. हे सभागृहातच दिसून येईल. सुत्रांच्या माहितीनुसार अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडे डॉ. तामदेव दुधबळे, संध्या दुधबळे, नामदेव सोनटक्के तर नव्याने भाजपात आलेले बंटी भांगडिया यांच्याकडून वर्षा कौशिक यांचेही नाव रेटले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुलचेराचे जिल्हा परिषद सदस्य जीवन कुत्तरमारे यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेसनेही अध्यक्ष पदासाठी जीवन नाट, लंकेश भोयर यांचे नाव समोर केले आहे. उपाध्यक्ष पदाकरीता राष्ट्रवादी काँग्रेस, युवाशक्ती आघाडी (चंदेल गट) यांच्याकडून छायाताई कुंभारे, अपक्ष सदस्य विश्वास भोवते, अतुल गण्यारपवार यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र सत्तेचे समिकरण किचकट झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेस निरीक्षक दिल्लीत; स्थानिक नेतेच घेणार निर्णय
प्रदेश काँग्रेसच्यावतीने निवडणूक निरीक्षक म्हणून विधान परिषद सदस्य आमदार हरिभाऊ राठोड शनिवारी गडचिरोलीत येणार होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या गडबडीमुळे ते आले नाहीत. त्यामुळे काँग्रेसची बैठक आज झाली नाही. स्थानिक स्तरावरील नेत्यांनी व जि.प. सदस्यांनी एकत्र बसून योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसला जिल्हा परिषदेत कुठल्याही परिस्थितीत पद हवे आहे. पक्षाच्या सदस्यांना बसण्यासाठी एक तरी चेंबर हवे, अशी भूमिका काँग्रेसचे नेते आता मांडू लागले आहे. जे पद देतील त्यांच्याकडे जाऊ असा काँग्रेसचा फॉर्म्युला आहे व तो सर्व गटांकडे ठेवलेला आहे.

Web Title: Two groups claim to be in power