दारू काढणाऱ्याला पकडून देऊनही कारवाईस चालढकल

By Admin | Updated: June 8, 2015 02:09 IST2015-06-08T02:09:16+5:302015-06-08T02:09:16+5:30

परिसरातील एडानूर येथील महिलांनी दारू विक्रेत्यांना पकडून चामोर्शी पोलिसांच्या समोर हजर करूनही पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

Take away the alcoholist and take action | दारू काढणाऱ्याला पकडून देऊनही कारवाईस चालढकल

दारू काढणाऱ्याला पकडून देऊनही कारवाईस चालढकल

दारू विक्रेत्यांची हिंमत वाढली : एडानूर येथील महिलांचा आरोप
तळोधी (मो.) : परिसरातील एडानूर येथील महिलांनी दारू विक्रेत्यांना पकडून चामोर्शी पोलिसांच्या समोर हजर करूनही पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या गावातील महिलांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
एडानूर परिसरात मोहफुलाची दारू खुलेआम काढली जात आहे. याबाबत पोलिसांना अनेक वेळा माहिती देण्यात आली. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे महिलांनीच दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. गावासभोवताल असलेल्या हातभट्ट्या शोधून काढण्यास सुरूवात केली. एडानूर येथील ध्यानसिंग जाधव या मोहफुलाची दारू विक्रेत्याला १२ मे रोजी पकडून चामोर्शी पोलिसांसमोर साहित्य व दारूसह हजर केले. त्यानंतर ४ जून रोजी रतन पवार याला पाच लिटर मोहफुलाच्या दारूसह चामोर्शी पोलिसांच्या स्वाधिन केले. मात्र चामोर्शी पोलिसांनी त्यांच्यावर अजुनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे महिलांमध्ये पोलीस प्रशासनाच्या कारभाराविषयी शंका व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांच्या आत या दारू विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई केली नाही तर पोलिसांविषयी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल, असा इशारा दिला आहे.
दारू विक्रेत्यांना पकडून देऊनही पोलीस कोणतीच कारवाई करण्यास तयार नसल्याने दारू विक्रेत्यांची हिंमत वाढत चालली असून एडानूर परिसरात आता खुलेआम दारू विकली जात आहे. त्यामुळे या दारू विक्रीला चामोर्शी पोलिसांचेच अप्रत्यक्षरित्या पाठबळ असावे, असाही आरोप गावातील महिलांनी केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Take away the alcoholist and take action