Survey of Bhamragad-Atapalli route | भामरागड-एटापल्ली मार्गाचा सर्व्हे
भामरागड-एटापल्ली मार्गाचा सर्व्हे

ठळक मुद्दे७० किमी रस्ता । पावसाळ्यात दरवर्षी नागरिकांना वाहतुकीस होतो त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड-एटापल्ली या दोन तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे अंतर ७० किमीचे आहे. परंतु या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील नदी, नाल्यांवर अनेक वर्षांपासून पुराची प्रतीक्षा आहे. परंतु काही दिवसांपासून रस्ताव पुलाचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू असल्याने या भागातील नागरिकांमध्ये पक्क्या रस्त्याची आशा निर्माण झाली आहे.
भामरागड-एटापल्ली मार्ग दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी सोयीचा आहे. दोन्ही तालुक्याला जोडणाºया रस्त्यावर जांभिया गट्टा हे गाव एटापल्ली तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. या गावातूनच अनेक कर्मचारी तालुका मुख्यालयात ये-जा करीत असतात. परिसरातील ३० गावांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे तर भामरागड तालुक्यातील कोठी हे गाव तालुक्यातील मोठे गाव आहे. जांभिया गट्टा व कोठी या गावातील अंतर १८ किमी असून या दोन्ही गावात दोन नाले आहेत. या दोन्ही नाल्यावर १९९६-९७ मध्ये बीआरओच्या माध्यमातून पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. परंतु नक्षल्यांच्या भीतीमुळे पुलाचे अर्धवटच बांधकाम करण्यात आले. काम अर्धवट सोडून बीआरओ परत गेले. त्यामुळे एका पुलाचे पिलरपर्यंत सुद्धा काम झाले नाही. तेव्हापासून नक्षल्यांचया भीतीमुळे सदर पुलाचे बांधकाम करण्यास कंत्राटदार धजावत नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथून भरपूर पाणी वाहत असते. जवळपास दोन ते तीन महिने वाहतूक ठप्प असते. एटापल्लीवरून गट्टापर्यंत बससेवा आहे. याशिवाय भामरागडपासून कोठीपर्यंत बससेवा असल्याने नागरिकांसाठी सोय झाली आहे. परंतु दुर्गम भागात पक्क्या रस्त्यांचा अभाव असल्याने तसेच नाल्यांवर पूल नसल्याने बससेवा उपलब्ध नाही.

४० गावांसाठी सोय
भामरागड-एटापल्ली मार्गाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील कारमपल्ली, कियर, हलवेर, नारगुंडा, पिडमिली, कोठी, मरकणार, तुंबरकोठी, मुरूमबुसी, तोयनार तसेच एटापल्ली तालुक्यातील गट्टा, जांभिया, आलेंगा, सुरजागड, मंगेर, नेंडेर, परसलगोंदी, तुमरगुंडा, आलदंडी परिसरातील एकूण ४० गावांच्या विकासाला गती मिळणार आहे. रस्त्याचे बांधकाम सुरू होणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा परिसरातील नागरिकांना आहे.

Web Title: Survey of Bhamragad-Atapalli route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.