गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 06:40 IST2025-05-21T06:39:35+5:302025-05-21T06:40:13+5:30
लाहेरी उपपोलिस ठाणे हद्दीत ५० वर माओवादी तळ ठोकून बसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस पथके, केंद्रीय राखीव दलाचे जवान मोहिमेवर रवाना झाले.

गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
गडचिरोली : जवानांविरुद्ध घातपाताचा कट रचणाऱ्या पाच जहाल माओवाद्यांना मंगळवारी भामरागडच्या बिनागुंडा गावातून ताब्यात घेतले. यात तीन महिलांचा समावेश आहे. अटकेतील तिघीही छत्तीसगडमधील आहेत. पाचजणांवर ३६ लाखांचे इनाम होते.
माओवाद्यांच्या प्लाटून क्र. ३२ ची विभागीय समितीची सदस्य उंगी मंगरू होयाम ऊर्फ सुमली (२८, रा. पल्ली, ता. भैरमगड, जि. बिजापूर), कमांडर पल्लवी केसा मीडियम ऊर्फ बंडी (१९, रा. कोंचल, ता. आवापल्ली जि. बिजापूर), सदस्य देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (१९, रा. मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली, जि. बिजापूर) यांचा यामध्ये समावेश आहे. एक स्वयंचलित एसएलआर रायफलसह एक ३०३ रायफल, तीन एसएसआर रायफल, दोन भरमार अशी एकूण सात हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
गोळीबार करणे टाळले
लाहेरी उपपोलिस ठाणे हद्दीत ५० वर माओवादी तळ ठोकून बसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस पथके, केंद्रीय राखीव दलाचे जवान मोहिमेवर रवाना झाले. संपूर्ण गावाला घेरून पाच संशयितांना शिताफीने पकडले. गावकऱ्यांना धोका पोहोचू नये म्हणून गोळीबार न करता जवानांनी मोहीम राबवली. काही माओवादी पळून गेले.
तेलतुंबडेचा बॉडीगार्ड देवसूचे आत्मसमर्पण
साडेतीन लाखांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी देवसू उर्फ देसू (२४, छत्तीसगड) या प्लाटून मेंबरने सोमवारी आत्मसमर्पण केले.