सहा किमी पायपीट, पहाटे प्रसववेदना; आधी बाळ गेले, नंतर आईचाही अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:33 IST2026-01-03T13:32:54+5:302026-01-03T13:33:12+5:30
दरम्यान, एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याऐवजी अहेरीला पाठविल्याने मृत्यूनंतरही माय-लेकरांची फरफट झाली, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

सहा किमी पायपीट, पहाटे प्रसववेदना; आधी बाळ गेले, नंतर आईचाही अंत
एटापल्ली (जि. गडचिरोली) : गावात प्रसूतीची सोय नसल्याने, नऊ महिन्यांच्या गर्भवतीने जंगलमार्गाने पतीसोबत बहिणीच्या गावी जाण्यासाठी तब्बल सहा किलोमीटर पायपीट केली. पहाटे तिला प्रसववेदना जाणवू लागल्यानंतर रुग्णवाहिकेतून हेडरी (ता. एटापल्ली) येथील हॉस्पिटलमध्ये भरती केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण आधी बाळ आणि काही वेळातच मातेने प्राण सोडले. ही हृदयद्रावक घटना २ जानेवारीला पहाटे घडली. दरम्यान, एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याऐवजी अहेरीला पाठविल्याने मृत्यूनंतरही माय-लेकरांची फरफट झाली, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
आशा संतोष किरंगा (२४, रा.आलदंडी टोला ता.एटापल्ली) असे त्या मृत मातेचे नाव आहे. आलदंडी हे तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे.
बाळ पोटातच गेले
दरम्यान, प्रसववेदना जाणवताच, तातडीने दवाखाना जवळ करता यावा, यासाठी १ जानेवारीला आशा किरंगा ही पती संतोषसोबत जंगलातील मार्गाने सहा किलोमीटर पायपीट करत, तोडसाजवळील पेठा गावात आपल्या बहिणीच्या घरी आली.
२ जानेवारीला मध्यरात्री तिला प्रसववेदना सुरु झाली. पेठा गावातील आशासेविकेने रुग्णवाहिकेतून हेडरी येथील दवाखान्यात तातडीने भरती केले. मात्र, बाळ पोटातच दगावल्याचे आढळले. त्यानंतर, आशा किरंगा यांचा रक्तदाब वाढला. त्यानंतर, त्या सावरल्याच नाहीत.