विसोरा : फाल्गुन पौर्णिमेला, मराठी वर्षातील अगदी शेवटचा सण होळी साजरा केला जातो. नव्याची सुरुवात करण्यासाठी चुकीचे आणि वाईट ते सारेच सोडून नवनिर्मितीचा ध्यास घेण्याचा हा शुभ दिवस. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी खेड्यात होळी सणाला एक वेगळाच माहौल असायचा. होळीच्या दुसऱ्याच दिवशी गायन, वादन, नृत्य यांच्या मिश्रणाची सांस्कृतिक झालर लाभलेला फागवा गावभर काढला जात असे. निव्वळ प्रथा, परंपरा म्हणून सण-उत्सव साजरे करण्याचा हेतू नसतो तर त्यातून आपसूकच आपल्या बोलीत एकमेकांप्रती असलेला प्रेम, लोभ, विनोद आणि राग पण व्यक्त केला जायचा. फागवा म्हणजे समाजातील विविध जातीधर्माच्या लोकांमध्ये असलेल्या कलात्मकतेचा आगळावेगळा आविष्कार होता. आज मात्र होळी सणाचा रंग गर्द करणारा हा फागवा दिवसेंदिवस फिक्कट होतो आहे.
होळीच्या दुसऱ्या दिवशी विसोरा येथील प्रत्येक मोहल्ल्यातील लोक एकत्र येत आणि फागवा म्हणून नाचत-गाजत गावभर घरोघरी भेट देत. त्यासाठी पुरुष हा महिलेचा वेश परिधान करून सोंग काढत. वाद्य म्हणून ढोलक आणि टाळ वाजविल्या जात. गावरान आणि मंजुळ अशा झाडीबोली भाषेच्या आपल्याच तालासुरात गाणे म्हणून नाचून फागवा काढला जायचा. फागवा काढताना प्रत्येकच घरून बक्षीस म्हणून पैसे मिळत. विशेष म्हणजे फागवा काढणारे गंमतीदार असे नृत्य आणि गायन करत. त्यामुळे काही वेळेस एखाद्या घरी शिजलेले वडे बक्षीस म्हणून देत आणि फागवा काढणारी मंडळी वडे खात खात गावभर फिरत आणि माहौल करत. दिवसभर फागवा झाल्यावर गावातील चौकात वा तिकड्यावर मोहल्ल्यातील लोक एकत्र बसत आणि सामूहिक पानदान कार्यक्रम आयोजित करत होते. त्यावेळी एका मोठ्या प्लेट मध्ये सुपारी, चुना आणि खायचा पान ठेवत आणि सारे लोक तिथे गोळा होऊन पान-सुपारी खात. त्यावेळी चर्चांचा जो गोफ रंगायचा त्याला कसलीही सीमा आणि तोड नसायची. आज काळ बराच बदलला असून होळी आणि फागवा हे सण-उत्सव सणासारखे वाटत नाही. होळीच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक घरी नाचत वाजत गाजत जाऊन फागवा मागण्याचा उत्सव असायचा. तो उत्सव आता राहिला नाही. त्यावेळेस होळीच्या निमित्ताने फागव्याला आपापसांतील स्नेहभाव, प्रेमभाव, आदर-सत्कार, वरिष्ठांना मान हे सगळे होते. आपण आता पाहतो सगळीकडे बदल होतोय. परिवर्तनाच्या लाटेत फागवा तर लुप्त झाला असून सण हे खरच सणासारखे आता वाटत नाही. अशी खंत विसोराचे ज्येष्ठ निवृत्त शिक्षक बुधाजी राऊत यांनी व्यक्त केली.
बाॅक्स
झुलव्यांमुळे चढत हाेती फागव्याच्या नृत्यात रंगत
होळीच्या सणाला गावात ढोलक वाजवत गावातील काही मंडळी मिरवणूक काढत. ज्याला बोलीभाषेत फागवा म्हणतात. या फागव्याच्या वेळेस झुलवे म्हटले जात. झुलवे हा काय प्रकार हे सुद्धा अनेकांना आज माहीत नाही. यावरून झुलवे लुप्त होत असल्याचे दिसते. पूर्वी लग्न आणि होळी या विशेष दिवशी गावातील नेमलेल्या खास व्यक्ती ढोलकीच्या तालावर झुलवे सादर करत. विसोरा, शंकरपुर, डोंगरमेंढा, कसारी, एकलपूर येथील अनेक लोकांशी संवाद साधला असता झुलव्यांबद्दल माहिती मिळाली.