एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By Admin | Updated: August 25, 2016 01:08 IST2016-08-25T01:08:02+5:302016-08-25T01:08:02+5:30

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विनाशर्त शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात यावे,

NRHM employees' agitation | एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

काळ्याफिती लावून केले काम : शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी
गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विनाशर्त शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी एनआरएचएमच्या जिल्हाभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी काळ्याफिती लावून काम केले. धानोरा, कोरची, देसाईगंज, गडचिरोली, मुलचेरा, अहेरीसह जिल्हाभरातील एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
धानोरा ग्रामीण रुग्णालयातील एनआरएचएमच्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. खोसे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच काळ्याफिती लावून कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी निवेदन देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. टेंभूर्णे, डॉ. गेडाम, डॉ. लेपसे, डॉ. निंबार्ते, कर्मचारी पंकज दुबे, गिरीश लेनगुरे, डेविड गुरनुले, लियास पठाण, गणेश कुळमेथे आदी उपस्थित होते.
कोरची ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना एनआरएचएम संघटनेच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी लेखापाल सचिन कोमरेलीवार, कार्यक्रम सहायक दिनेश अंबादे, पवन बन्सोड व इतर कर्मचारी उपस्थित होते.
मागण्या मान्य न झाल्यास एनआरएचएमचे कर्मचारी आंदोलन तीव्र करणार आहेत. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील आरोग्यसेवा प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: NRHM employees' agitation