तेलतुंबडे देत होता २७ वर्षे हुलकावणी, 'या' नावांनी वावरायचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 07:16 AM2021-11-15T07:16:12+5:302021-11-15T07:17:16+5:30

कोळसा खाणकामगार ते नक्षली नेता

Milind Teltumbde was giving away 27 years | तेलतुंबडे देत होता २७ वर्षे हुलकावणी, 'या' नावांनी वावरायचा

तेलतुंबडे देत होता २७ वर्षे हुलकावणी, 'या' नावांनी वावरायचा

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांतच मिलिंद कामगार चळवळीत सहभागी झाला. १९९४ पूर्वी त्याने ‘नवजीवन भारत सभा’ या संघटनेचा अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यानंतर तो प्रत्यक्ष नक्षल चळवळीत सक्रिय झाला

गडचिरोली : नक्षल चळवळीत वरिष्ठ नेतेमंडळींमध्ये आतापर्यंत तेलगू नेत्यांचे प्राबल्य होते; पण नक्षल्यांच्या केंद्रीय समितीपर्यंत मजल गाठत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या झोनल कमिटीची धुरा सांभाळणारा मिलिंद तेलतुंबडे हा एकमेव मराठी नेता होता. नक्षली झाल्यापासून तो कधीही पोलिसांच्या हाती लागला नाही. शनिवार (दि. १३)च्या चकमकीत अखेर पोलिसांच्या गोळीने त्याचा वेध घेतला. मिलिंद ऊर्फ जिवा उर्फ दीपक ऊर्फ प्रवीण ऊर्फ अरुण ऊर्फ सुधीर ऊर्फ सह्याद्री (५६) अशा वेगवेगळ्या नावांनी तो वावरायचा. त्याचा जन्म यवतमाळच्या वणी तालुक्यातील राजूर येथील. दहावीनंतर त्याने आयटीआय केले. १९८४-८५ मध्ये तो धोपटाडा (सास्ती) येथील खाणीत कामगार म्हणून लागला. पद्मापूर खाणीत काम करताना त्याचा संपर्क कामगार संघटनेचे ॲड. सृजन अब्राहम यांच्याशी आला. तेव्हापासून तो नक्षल विचारसरणीकडे आकर्षित झाला.

काही दिवसांतच मिलिंद कामगार चळवळीत सहभागी झाला. १९९४ पूर्वी त्याने ‘नवजीवन भारत सभा’ या संघटनेचा अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यानंतर तो प्रत्यक्ष नक्षल चळवळीत सक्रिय झाला. नक्षलवादी झाल्यानंतर त्याने चंद्रपूर, वणी, उमरेड, नागपूर या कोळसा पट्ट्यांमध्ये विभागीय समिती सदस्य (डीव्हीसीएम) म्हणून काम केले. २००४-०५ मध्ये मिलिंदला महाराष्ट्र स्टेट कमिटीचे सदस्यत्व मिळाले. तत्कालीन सचिव श्रीधर श्रीनिवासन याच्या अटकेनंतर त्याची पदोन्नती होऊन त्याच्याकडे स्टेट कमिटीचा सचिव जबाबदारी आली. २०१२-१३ मध्ये उत्तर गडचिरोली-गोंदिया-बालाघाट डिव्हिजनचे प्रभारी करण्यात आले. २०१३ मध्ये त्याला सेंट्रल कमिटीचे सदस्यत्व दिले.

३ राज्यांची जबाबदारी
नक्षलवाद्यांनी २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या नवीन झोनची स्थापना केली. त्याची जबाबदारी मिलिंदवर देण्यात आली. गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील बालाघाट आणि छत्तीसगडमधील लगतच्या जिल्ह्यांमधील अनेक कारवाया त्याच्याच योजनेनुसार करण्यात आल्या. १ मे २०१९ रोजी १५ पोलिसांच्या मृत्यूस कारणीभूत जांभूळखेडा स्फोट त्याच्याच नियोजनाचा भाग होता.

Web Title: Milind Teltumbde was giving away 27 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.