Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 23:52 IST2025-10-30T23:49:44+5:302025-10-30T23:52:08+5:30
दोन दिवसांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या केंद्रीय समिती सदस्य 'चंद्राण्णा'ने देवजी महासचिव असल्याचा दावा केला होता. पण त्याच संघटनेतीलच माजी सहकाऱ्यांनी हा दावा पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले.

Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
गडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)च्या महासचिव बसवराजूच्या मृत्यूनंतर संघटनेचा नवा प्रमुख कोण, या चर्चेने जोर धरला होता. मात्र थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी हा नवा महासचिव असल्याचा दावा पूर्णपणे फोल असल्याचे आता नक्षल्यांच्या ओडिशा राज्य समितीनेच स्पष्ट केले आहे. छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रानंतर आता ओडिशानेही याच सुरात सूर मिसळला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या केंद्रीय समिती सदस्य 'चंद्राण्णा'ने देवजी महासचिव असल्याचा दावा केला होता. पण त्याच संघटनेतीलच माजी सहकाऱ्यांनी हा दावा पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणारा असल्याचे ठासून सांगितले आहे. अखेर ओडिशा समितीचा प्रमुख गणेश याने २९ ऑक्टोबर रोजी पत्रक जारी करून 'चंद्राण्णा'वर पलटवार करत संघटनेने अद्याप नवा महासचिव निवडलेलाच नाही, असा ठाम दावा केला.
गणेश याच्या दोन पानांच्या पत्रकात 'चंद्राण्णा'वर कडाडून टीका केली आहे. आत्मसमर्पण करून स्वतःला क्रांतिकारी म्हणवण्याचा त्यांना अधिकार नाही, असा टोलाही पत्रकाद्वारे लगावला असून, लोकांची दिशाभूल करून आपली घसरलेली प्रतिमा वाचवण्याचा हा मुखवटा आहे, असे शब्दप्रयोग करून ओडिशा समितीने त्याच्यावर हल्लाबोल केला आहे. बसवराजूच्या मृत्यूनंतर केंद्रीय समितीची बैठकच झालेली नाही, मग महासचिव निवडीचा प्रश्नच कुठून आला, असा सवालही गणेश याने उपस्थित केला आहे.
संघटना पुन्हा उभारी घेईल...
सध्या संघटना कठीण टप्प्यातून जात असल्याचे ओडिशा समितीने मान्य केले आहे. गेल्या दोन वर्षांत पक्षाचे मोठे नुकसान झाले , पण संघटना परत उभी राहील, असा विश्वास पत्रकातून व्यक्त केला आहे. बेरोजगारी, सामाजिक-आर्थिक विषमता यांसारख्या समस्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करून, जनतेसमोर सशस्त्र लढ्याचाच मार्ग शिल्लक राहिला आहे, असा जुनाच दावा समितीने पुन्हा केला आहे.