गावडेंच्या प्रचारार्थ आंध्रच्या माजी मंत्र्यांची पदयात्रा

By Admin | Updated: October 11, 2014 23:09 IST2014-10-11T23:09:05+5:302014-10-11T23:09:05+5:30

अहेरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार मुक्तेश्वर गावडे यांच्या प्रचारार्थ सिरोंचा येथे शनिवारी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत आंध्र प्रदेशचे माजी मंत्री तथा सध्याच्या तेलंगणाचे काँग्रेस

Former Andhra Pradesh minister's footsteps for campaigning | गावडेंच्या प्रचारार्थ आंध्रच्या माजी मंत्र्यांची पदयात्रा

गावडेंच्या प्रचारार्थ आंध्रच्या माजी मंत्र्यांची पदयात्रा

सिरोंचा : अहेरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार मुक्तेश्वर गावडे यांच्या प्रचारार्थ सिरोंचा येथे शनिवारी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत आंध्र प्रदेशचे माजी मंत्री तथा सध्याच्या तेलंगणाचे काँग्रेस नेते विनोद गड्डम सहभागी झाले होते.
सिरोंचा येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेत काँग्रेस उमेदवार मुक्तेश्वर गावडे, तालुकाध्यक्ष अब्दुल रहिम सहभागी झाले होते. यावेळी शहरातील मुख्य मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. आंध्रचे माजी मंत्री विनोद गड्डम यांच्या कुटुंबियांचे सिरोंचा शहराशी जवळचे नाते आहे. गड्डम यांचे भाऊ माजी खासदार डॉ. गणेश व त्यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री व्यंकटेश्वरूलू यांचेही सिरोंचा तालुक्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. त्यामुळे या तालुक्यात या कुटुंबियांचा प्रभावही आहे. त्यामुळे विनोद गड्डम यांच्या दौऱ्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला फायदा होईल, असे वर्तविले जात आहे. विनोद गड्डम यांच्या पदयात्रेमुळे सिरोंचा येथील कार्यकर्त्यांमध्ये मोठी ऊर्जा संचारली आहे. पदयात्रेपूर्वी विनोद गड्डम यांनी सिरोंचा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत जातीयवादी पक्षांना निवडणुकीत रोखायचे असेल तर काँग्रेसला विजयी करावे, याकरिता कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन विनोद गड्डम यांनी केले. कार्यक्रमादरम्यान सिरोंचाच्या पं. स. सभापती लालुबाई मडावी यांचा विनोद गड्डम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला तेलंगणाचे काँग्रेस नेते कर्णास्वरराव, राजा गौडा, लक्ष्मी राजा गौडा, अहेरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेबुब अली, श्रीनिवास गन्नू, शहराध्यक्ष बशीरोद्दीन, ग्रा. पं. सदस्य रवी सल्लमवार, श्याम बेझनवार, व्यंकटेश चिलमकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Former Andhra Pradesh minister's footsteps for campaigning