भर उन्हाळ्यात परीक्षेचे नियोजन; विद्यार्थ्यांना बसणार उन्हाचे चटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:47 IST2025-03-17T14:44:17+5:302025-03-17T14:47:15+5:30
Gadchiroli : अंशावर उन्हाचा पारा गेला आहे यात पुन्हा वाढ होऊ शकते.

Exams planned for the middle of summer; Students will suffer from the heat of the sun
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पहिली ते नवव्या वर्गापर्यतच्या वार्षिक परीक्षा २५ एप्रिलपर्यंत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या कालावधीत कडक उन्हाळा असतो. तसेच, १ मे रोजी निकाल जाहीर करायचा असतो. एवढ्या कमी कालावधीत निकाल जाहीर करणे शक्य होणार नाही. या सर्व अडचणी लक्षात घेता. १२ एप्रिलपूर्वी परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.
शिक्षण आयुक्त यांचे दिनांक ५ मार्च, २०२५ च्या पत्रानुसार राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक सध्या निर्गमित केले आहे. संकलित चाचणी २५ एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश आहेत.
२५ एप्रिलला शेवटचा पेपर ठेवला आहे. त्यानंतर चार ते पाच दिवसात उत्तरपत्रिका तपासणे, संकलित निकाल तयार करणे, प्रगती पुस्तके लिहिणे इत्यादी कामे चार ते पाच दिवसात होणे शक्य नाही.
१२ एप्रिलपर्यंत घ्या परीक्षा
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कडक ऊन, पिण्याच्या पाण्याची टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा ठेवणे योग्य होणार नाही. या सर्व बाबींचा विचार करून तिसरी ते नववी पर्यंतच्या वार्षिक परीक्षा १२ एप्रिल पूर्वी घेण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पुंडलिक देशमुख, रज्जन्ना बिट्टीवार, अमरदीप भुरले, रवींद्र गावंडे, संजय मेश्राम, रघुपती मुरमाडे, गुरूदास सोमणकर, यमाजी मुज्जमकर, तुळशीदास ठलाल, खुशाल भुरसे, आशा दाकोटे यांनी केली आहे.
"जिल्हा परिषद शिक्षकाला नियमित कामे करून पेपर तपासावे लागतात. एवढ्या कमी कालावधीत हे सर्व काम करणे शक्य होत नाही. तसेच विदर्भात कडक उन्हाळा असतो. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत परीक्षा घेण्यात याव्यात."
- पुंडलिक देशमुख, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना