वादाला जातीयतेचे स्वरूप देण्याचा कट

By Admin | Updated: June 26, 2015 00:10 IST2015-06-26T00:10:46+5:302015-06-26T00:10:46+5:30

तालुक्यातील गुरनोली येथील काही व्यक्तींकडून वैयक्तिक वादाला जातीयतेचे स्वरूप देऊन प्रकरण वाढविण्याचा कट...

The conspiracy to give the form of communalism | वादाला जातीयतेचे स्वरूप देण्याचा कट

वादाला जातीयतेचे स्वरूप देण्याचा कट

कुरखेडा : तालुक्यातील गुरनोली येथील काही व्यक्तींकडून वैयक्तिक वादाला जातीयतेचे स्वरूप देऊन प्रकरण वाढविण्याचा कट होत असल्याचा आरोप ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी कुरखेडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
मागील दोन वर्षांच्या कालावधीत गुरनोली येथील वैयक्तिक वादाला जातीयतेचे स्वरूप देऊन अनुसूचित जाती/ जमाती प्रतिबंधक कायद्याचा (अ‍ॅट्रॉसिटी) दुरूपयोग करून काही लोकांकडून खोटे आरोप केले जात आहेत. गावातील विकासकामांत कोणतेही सहकार्य न करता कामात अडथळे आणण्याचे काम संबंधितांकडून होत आहेत. मागील वर्षी शाहू- फुले- आंबेडकर दलित वस्ती सुधार स्पर्धेत गुरनोली ग्राम पंचायत तालुक्यात व जिल्ह्यात द्वितीय क्रमांकावर आल्यानंतरही विभागीय तपासणी समितीला सदर मंडळींनी खोटी माहिती देऊन गावाची प्रतिमा खराब केली व गावाला दलित वस्ती विकासाकरिता मिळणारे बक्षीस गमवावे लागले. आदर्श गाव योजनेतून दरवर्षी १ ते ७ जून दरम्यान ग्राम विकास व जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. परंतु या सप्ताहादरम्यान सदर मंडळींकडून रस्त्यावर कचरा टाकणे, बाहेर रस्त्यावर शौचास बसणे आदी प्रकार सर्रास होतात. मागील वर्षी सुनियोजित कटानुसार आपल्यावरही खोटे आरोप करण्यात आले होते, अशी माहिती उपसरपंच राजन खुणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला सरपंच लहूजी किरंगे, तंमुस अध्यक्ष अशोक दुधकुंवर, आदर्श गाव समिती अध्यक्ष आनंदराव उसेंडी, रोहयो समिती उपाध्यक्ष हरी शेंद्रे, राजेंद्र नंदेश्वर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The conspiracy to give the form of communalism