पावणेदोन लाख लोकसंख्येच्या आरोग्यसेवेचा भार एकाच डॉक्टरवर

By Admin | Updated: June 4, 2015 01:42 IST2015-06-04T01:42:01+5:302015-06-04T01:42:01+5:30

३० खाटांची व्यवस्था असलेल्या चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण सहा पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

The burden of health care of the population of Pavanodon is one single doctor | पावणेदोन लाख लोकसंख्येच्या आरोग्यसेवेचा भार एकाच डॉक्टरवर

पावणेदोन लाख लोकसंख्येच्या आरोग्यसेवेचा भार एकाच डॉक्टरवर

लोमेश बुरांडे  चामोर्शी
३० खाटांची व्यवस्था असलेल्या चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण सहा पदे गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. चामोर्शी तालुक्यात एकूण २२६ गावांचा समावेश असून तालुक्याची लोकसंख्या जवळपास एक लाख ७५ हजार आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची सेवा ढासळल्यामुळे या रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या चामोर्शीच्या रुग्णालयात एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून त्यांच्यावर पावणे दोन लाख लोकसंख्येच्या आरोग्यसेवेचा भार आहे. रिक्तपदांमुळे या रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचे पूर्णत: बारा वाजले आहे.
चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात एका वैद्यकीय अधीक्षकांसह चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. सध्या या रुग्णालयात एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. तर वैद्यकीय अधीक्षकांसह डॉक्टरांची दोन पदे रिक्त आहेत. लॅब तंत्रज्ञ व वॉर्ड बॉयची पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालयात दररोज जवळपास २०० ते २५० रुग्ण आंतर व बाह्य रुग्ण विभागात औषधोपचारासाठी येतात. मात्र पुरेशा डॉक्टर व कर्मचाऱ्यांअभावी येथे रुग्णांना चांगली आरोग्यसेवा मिळणे दुरापास्त झाले आहे.
वाढत्या उष्णतामानामुळे व वातावरणातील बदलामुळे चामोर्शी तालुक्यात विविध आजाराने हजारो लोक ग्रस्त आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात रुग्णांची संख्या मोठी आहे. तालुक्यात खासगी वैद्यकीय सेवा अत्यल्प असून खासगी औषधोपचार महागडा असल्याने चामोर्शीच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या रुग्णालयाची आरोग्यसेवा ढासळली आहे. यापूर्वी या रुग्णालयात डॉ. इंद्रजीत नागदेवते व डॉ. देवरी हे दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र डॉ. नागदेवते यांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली. तेव्हापासून येथे एकच डॉक्टर कार्यरत आहे. मात्र रुग्णालयाच्या ढेपाळलेल्या सेवेकडे या भागातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.
डॉ. नागदेवते यांना चामोर्शीत परत पाठवा
येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुनघाटे यांची सहा महिन्यापूर्वी बदली करण्यात आली. त्यानंतर कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजीत नागदेवते यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक पदाचा प्रभार सोपविण्यात आला. त्यांनी या रुग्णालयात चांगली सेवा दिली. मात्र त्यांची गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात बदली करण्यात आली. त्यांची बदली रद्द करून त्यांना परत चामोर्शीत पाठवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: The burden of health care of the population of Pavanodon is one single doctor