जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले

By संजय तिपाले | Published: May 3, 2024 02:22 PM2024-05-03T14:22:24+5:302024-05-03T15:31:37+5:30

गडचिरोली जिल्हा हादरला: १५ जणांना अटक , मृत महिलेचा पती, मुलाचा आरोपींत समावेश

Both were burned alive on suspicion of witchcraft | जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले

Suspect of black magic burned alive

गडचिरोली : जादूटोणा केल्याच्या संशयातून एका पुरूषासह महिलेस जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे ३ मे रोजी उघडकीस आली. या घटनेने जिल्हा हादरला आहे. दरम्यान, पोलिसांनी १५ आरोपींना जेरबंद केले असून मृत महिलेच्या पतीसह मुलाचा आरोपींत समावेश आहे.

जननी देवाजी तेलामी (५२), देवू कटयी आतलामी (५७, दोघे रा. बारसेवाडा) अशी मयतांची नावे आहेत. एटापल्लीपासून १० किलोमीटर अंतरावर वनगट्टा ते चंदनवेली  या मार्गावर बोलेपल्ली हे गाव आहे. गावातील एका कुटुंबातील एका महिलेचा गर्भपात झाला. त्यानंतर महिन्यापूर्वी एका महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला होता. १ मे रोजी याच कुटुंबातील दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. हे मृत्यूसत्र जादूटोणा केल्याने होत असल्याचा संशय त्या कुटुंबाला होता. यातून १ मे रोजी जननी तेलामी व देवू आतलामी यांना रात्री साडेसहा वाजता घरी जाऊन मारहाण केली. त्यानंतर गावापासून एक किलमीटर अंतरावरील नाल्यात नेऊन जिवंत जाळण्यात आले. यात दोघांचाही मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न केला, पण मयत जननी हिचा भाऊ शाहू मोहनंदा (रा. वासामुंडी) यांनी एटापल्ली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. १ ५ जण पोलिसांच्या ताब्यात असून आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी अहेरीचे अपर अधीक्षक एम.रमेश, एटापल्लीचे उपअधीक्षक चेतन कदम यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक नीलकंठ कुकडे तपास करीत आहेत.

दोघेही करायचे पुजारी म्हणून काम 
दरम्यान, मयत जननी तेलामी व देवू आतलामी हे दोघे वेगवेगळ्या कुटुंबातील असून पुजारी म्हणून काम करत. जादूटोणा केल्याच्या संशयातून त्यांना संपविण्याचा कट आखला. यात मृत जननी हिचा पती देवाजी तेलामी (६०) व मुलगा दिवाकर तेलामी (२८) यांनीही आरोपींना साथ दिली, असे तपासात समोर आले आहे.

भामरागड तालुक्यातील घटनेची पुनरावृत्ती 
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरीत वृध्द आजी- आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या केल्याची खळबळजनक घटना ७ डिसेंबर २०२३ रोजी उघडकीस आली होती. जादूटोणा केल्याच्या संशयातून हे हत्याकांड घडले होते. या घटनेची बारसेवाडा येथे पुनरावृत्ती झाली.

 

Web Title: Both were burned alive on suspicion of witchcraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.