मला पराभूत करण्यासाठी भाजपने डमी उमेदवार उभे करून पाच कोटी खर्च केले ; धर्मरावबाबांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:13 IST2025-10-13T15:11:41+5:302025-10-13T15:13:19+5:30
धर्मरावबाबांचा भाजपवर आरोप : जनकल्याण यात्रा

BJP spent Rs 5 crores by fielding dummy candidates to defeat me; Dharmaraobaba alleges
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : विधानसभा निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी भाजपने रणनीती आखली होती, असा खळबळजक आरोप राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. भाजपने डमी उमेदवार म्हणून पुतणे अम्ब्रीशराव यांना माझ्याविरोधात उभे केले, पाच कोटी रुपये देखील खर्च केले होते, पण जनतेने माझ्याच बाजूने कौल दिला, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
भाजपच्या ताब्यातील गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शीत १२ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता नगरपंचायतच्या प्रांगणात राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) जनकल्याण यात्रेनिमित्त सभा झाली.
...तर जि.प. स्वबळावर
अहेरीत इतर पक्ष आहेत कुठे ? आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर ५१ पैकी ३२ जागा मागू, अन्यथा राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वबळावर लढेल, असे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. जिल्हा परिषदेसाठी सर्व ५१ व पंचायत समितीच्या १०२ जागा लढविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अहेरी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्व १९ जागांवर पक्ष लढेल, असे सांगून त्यांनी तिथे इतर पक्ष आहेतच कुठे, असा प्रश्न करुन भाजपसह काँग्रेस नेत्यांवर उपरोधिक टीका केली