गडचिरोलीत शेवटच्या क्षणी भाजपमध्ये मोठी घडामोड, प्रणोती निंबोरकर यांना उमेदवारी
By संजय तिपाले | Updated: November 17, 2025 15:10 IST2025-11-17T15:09:06+5:302025-11-17T15:10:19+5:30
शह- काटशहाची खेळी : शक्तिप्रदर्शनाची चढाओढ, पालिकेला यात्रेचे स्वरुप

Big last-minute move in BJP in Gadchiroli, Pranoti Nimborkar gets candidature
गडचिरोली : जिल्ह्यातील तीन नगरपालिकांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारीची मोठी उत्कंठा होती. नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जोरदार चुरस पाहावयास मिळाली. अखेर १७ नोव्हेंबरला दुपारी १ वाजेपर्यंत भाजपकडून रीना चिचघरे यांचे नाव आघाडीवर होते, शेवटच्या क्षणी प्रणोती सागर निंबोरकर यांना पक्षाने ए.बी. फॉर्म दिला. त्यांचा सामना काँग्रेसच्या कविता सुरेश पोरेड्डीवार यांच्याशी होणार आहे.
गडचिरोली पालिकेत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसंदर्भात भाजपमध्ये जोरदार चुरस होती. पक्षात उभे दोन गट उभे पडले होते, मात्र अखेरच्या क्षणी वेगवान हालचाली झाल्या. सकाळी सुरुवातीला रीना चिचघरे यांचे नाव पुढे होते. दुपारी एक वाजेनंतर वेगळ्या हालचाली झाल्या अन् पक्षाने ए.बी. फॉर्म प्रणोती सागर निंबोरकर यांना दिला.
गडचिरोलीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. उमेदवारीच्या स्पर्धेत भाजपमध्ये महिला पदाधिकाऱ्यांत जोरदार चुरस पाहायला मिळाली. भाजप महिला जिल्हाध्यक्षा व माजी नगराध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे, भाजप जिल्हा महामंत्री गीता सुशील हिंगे, प्रणोती सागर निंबोरकर आणि रीना सतीश चिचघरे यांच्यात स्पर्धा होती. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अखेर प्रणोती निंबोरकर यांना संधी दिली.
काँग्रेसच्या उमेदवार कविता सुरेश पोरेड्डीवार या गडचिरोलीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सा. पोरेड्डीवार यांच्या पत्नी असून निवृत्त प्राचार्या आहेत. दरम्यान, विविध राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले, यामुळे पालिका परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. वाहतूक ठप्प झाली होती.