बीडीएस प्रणाली ठप्प : शिक्षकांची हक्काची ठेव अडकली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:27 IST2025-08-11T18:26:33+5:302025-08-11T18:27:56+5:30
बीडीएस प्रणाली महिनाभरापासून बंद : जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी सापडले संकटात

BDS system stalled: Teachers' rights deposit stuck!
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यभरातील शिक्षकांसाठी कार्यरत असलेली बीडीएस (बिल डिस्काउंटिंग सिस्टम) प्रणाली गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन हजारांवर शाळांमधील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काची ठेव रक्कम अडकून पडली असून, त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या महिन्यापासून ही प्रणाली पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा थेट परिणाम शिक्षकांच्या आर्थिक व्यवहारांवर होत असून, आता गरज भासल्यावर त्यांनी पतसंस्था किंवा इतर बँकांकडे जास्त व्याजदराने कर्ज घेणे सुरू केले आहे. शहरी व ग्रामीण भागात राहणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणर्णीचा सामना करावा लागत आहे.
काय आहे बीडीएस यंत्रणा
शिक्षकांनी आपल्या पगारातून नियमितपणे वजा करून बीडीएस योजनेत ठेव रक्कम गुंतवलेली असते. बीडीएस प्रणालीच्या माध्यमातून शाळा, शिक्षण संस्था तसेच सहकारी बँका यांच्यामार्फत शिक्षकांना परतावा आणि नापरतावा या तत्त्वावर पैसे मिळतात.
मुला-मुलींचे लग्न झाले तरीही पैसे मिळेना
शिक्षकांच्या मुलामुलींचे लग्न झाले. लग्नकार्यासाठी मोठा खर्च आला. मात्र, हक्काची ठेव रक्कम मिळाली नाही. तसेच घर बांधकाम, मुलांचे शिक्षणासाठी पैसे लागतात.
कर्जाने पैसे काढण्याची पाळी
असल्याने शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत असून, गरजेच्या वेळी आपलेच पैसे मिळवण्यासाठी त्यांना व्याजाने कर्ज घ्यावे लागत आहे. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन ही प्रणाली पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली जात आहे.
यंत्रणेत तांत्रिक बिघाड
बीडीएस प्रणालीत अडथळा का निर्माण झाला याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड आहे की निधी अभावामुळे प्रणाली थांबवण्यात आली आहे, याबाबत अनभिज्ञता आहे. बीडीएस प्रणाली सुरू होणार तरी कधी? असा सवाल शिक्षक व कर्मचारी करीत आहेत.
साहेब प्रणाली सुरू होणार तरी कधी ?
राज्य शासन किंवा शिक्षण विभागाकडून बीडीएस प्रणाली सुरू होणार असल्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. राज्यस्तरावर निर्णय प्रक्रियेत असून आर्थिक विभाग व संबंधित बँक यांच्यातील समन्वयातून ही प्रणाली पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ठोस तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. अलिकडे शिक्षक वेगवेगळ्या पेन्शन योजनेत आपल्या वेतनातून विशिष्ठ रक्कम गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे बीडीएस प्रणालीत शिक्षकांचा फारसा सहभाग असल्याचे दिसून येत नाही.
"शिक्षक व कर्मचाऱ्यांचे यापूर्वी पैसे निघाले आहेत. सध्यातरी कार्यालय स्तरावर बीडीएस प्रणालीबाबत तक्रारी नाहीत."
- वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी, माध्य.