पाणीपुरवठा योजनेला मंजुरी

By Admin | Updated: September 4, 2016 02:00 IST2016-09-04T02:00:15+5:302016-09-04T02:00:15+5:30

पाणी पुरवठा योजनेच्या निर्मितीचे श्रेय लाटण्यासाठी येथील पाणीपुरवठा योजनेला मागील सहा वर्षांपासून मंजुरी रखडली होती.

Approval of water supply scheme | पाणीपुरवठा योजनेला मंजुरी

पाणीपुरवठा योजनेला मंजुरी

सर्व्हेचे काम सुरू : वैरागडातील पाणीटंचाईची समस्या सुटणार
वैरागड : पाणी पुरवठा योजनेच्या निर्मितीचे श्रेय लाटण्यासाठी येथील पाणीपुरवठा योजनेला मागील सहा वर्षांपासून मंजुरी रखडली होती. अखेर प्रशासनाने सदर योजना निर्मितीला हिरवी झेंडी दाखविली असून पाईपलाईन टाकण्यासाठी सर्व्हेच्या कामाला सुरूवात झाली आहे.
वैरागड-मानापूर जिल्हा परिषद क्षेत्राचे विद्यमान सदस्य व समाज कल्याण सभापती यांच्यात वैरागड येथील पाणी पुरवठा योजनेवरून बरेच दिवस कलगीतुरा चालला होता. पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेण्याच्या नादात पाच-सहा वर्षांपासून ही योजना रखडली होती. जुन्या योजनेचे पाणी पुरत नसल्याने वैरागड येथे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत होती.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना बांधली जाणार आहे. ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी वैरागड येथे बांधली जाणार आहे. या योजनेची इन्टेकवेल व जॅकवेल गोरजाई डोहावर होणार आहे. या पाणी पुरवठा योजनेला फिल्टरही जोडले जाणार आहे. नवीन पंप गृह बांधून व नवीन पाईपलाईन खोदली जाणार आहे. संपूर्ण गावात या टाकीच्या मार्फतीने पाणी पोहोचविले जाणार असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता पांडे यांनी दिली आहे. नवीन पाणी पुरवठा योजना बांधण्यासाठी लेवल सर्वेचे काम सुरू करण्यात आले आहे.
प्रारूप आराखडा तयार केला जाऊन या कामाला आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर योजनेला मंजुरी मिळावी, यासाठी लोकमतच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता, हे विशेष. (वार्ताहर)

Web Title: Approval of water supply scheme