आज लागणार दहावीच्या परीक्षांचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 05:59 IST2021-07-16T05:58:19+5:302021-07-16T05:59:06+5:30

विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार. पाहा कुठे पाहाल निकाल?

Today will be the result of the 10th exam you can check online | आज लागणार दहावीच्या परीक्षांचा निकाल

संग्रहित छायाचित्र

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार. पाहा कुठे पाहाल निकाल?

मुंबई : राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 

राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवले.  

नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदान करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी ऑनलाइन जाहीर होणारा निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

परीक्षेसाठी बसलेले
विद्यार्थी     :     ९,०९,९३१
विद्यार्थिंनी  :     ७,४८,६९३
एकूण        :     १६,५८,६२४

  • निकाल पाहण्यासाठी लिंक : result.mh-ssc.ac.in
  • शाळांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी : www.mahahsscboard.in

Web Title: Today will be the result of the 10th exam you can check online