Corona Virus: शाळांची घंटा अखेर वाजणार, १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू होणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 16:40 IST2021-11-25T16:30:23+5:302021-11-25T16:40:06+5:30
Education News: कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील शाळांची घंटा अखेर वाजणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनचे शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत. (School Reopen In Maharashtra)

Corona Virus: शाळांची घंटा अखेर वाजणार, १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे सर्व वर्ग सुरू होणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
मुंबई - कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील शाळांची घंटा अखेर वाजणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनचे शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत ऑनलाईन भरणारे राज्यातील शाळांचे पहिलीपासूनचे वर्ग आता प्रत्यक्ष मुलांच्या उपस्थितीने गजबजणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा फैलाव खूप कमी झाला आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शाळांचे पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्यासाठी ही वेळ अनुकूल असल्याचा अंदाज घेऊन राज्य सरकारने १ डिसेंबरपासून राज्यातील शाळांचे पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने आझ झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.
दरम्यान, राज्यातील माध्यमिक शाळांचे वर्ग काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. त्यानुसार आठवी ते दहावी तसेच ११ वी १२ वीचे वर्ग सुरू झाले होते. मात्र लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून पहिली ते सातवीचे वर्ग अद्यापही सुरू झाले नव्हते. मात्र आता हे वर्ग सुरू होणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील शाळांचे बहुतांश वर्ग बंद होते. मात्र आता राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू होणार आहेत, शाळेमध्ये सुरक्षित आणि आरोग्यमय वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच शाळा सुरू झाल्यावर घ्यावयाची खबरदारी आणि नियमावलीबाबत आम्ही येत्या आठ दिवसांमध्ये निर्णय घेणार आहोत, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.